रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. भाविकांच्या भावना जुळलेल्या मंदिरांचे अस्तित्व लयाला जाण्याचा धोका असतानाही पुरातत्व खात्याचा केवळ अधिकार गाजविणारा फलक मंदिरांपुढे मिरवत आहे. परंतु तडे गेलेल्या, खांब कलथून पडलेल्या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाला फुरसद नाही.विदर्भातील ९३ देखण्या हेमाडपंथी मंदिरांची गॅजेटमध्ये नोंद आहे. त्यातील ७ मंदिरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. नोंद नसलेल्या मंदिरांची संख्या विदर्भात २०० आहे. पुरातत्व विभागाने ताब्यात घेतलेल्या अनेक मंदिरांची पडझड सुरू झाली आहे. बाराव्या शतकात औरंगाबादजवळील देवगिरीचे राजे रामदेवराय यादव यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी ही मंदिरे उभारली. या सर्व हेमाडपंथी मंदिरांची रचना एकसारखी आहे. काळेशार चिरेदार दगड एकावर एक रचून विशिष्ट पद्धतीने ते एकत्र जुळविण्यात आले आहे. या दगडांवर नक्षीकाम आहे. मंदिरांना आतून सुशोभित करण्यात आले आहे. शिखरामध्ये तप करण्यासाठी खोल्या उभारण्यात आल्या आहेत. नदी, संगम आणि कुंड आदींच्या शेजारी ही मंदिर आहेत.पूर्वी अतिशय घनदाट जंगलात ही मंदिरे होती. आता या ठिकाणी जंगल विरळ झाले. मात्र चांगल्या पायवाटाही राहिल्या नाही. पुरातत्व विभागाने मंदिरांपुढे आपल्या विभागाचे फलक लावले. मात्र पुरातत्व विभाग या मंदिराची देखभाल करण्यास विसरले आहे.मंदिरांचे दगड काही ठिकाणी सरकले आहेत. गाभाºयात पाणी गळत आहे. अनेक ठिकाणी तडे गेले. काही भागात कुंडांची पडझड झाली आहे. यामुळे सुरेख मंदिरांचा वारसा येणाºया पिढीला कसा दिसेल, हा प्रश्न आहे. पुरातत्व विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.पुरातत्व विभागाच्या यादीतील मंदिरेपुरातत्व विभागाने जिल्ह्यातील सात हेमाडपंथी मंदिरे ताब्यात घेतली आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर, महागाव कसबा, राऊत सावंगी, येळाबारा, पांढरदेवी, रूईवाई आणि नेरमधील सोमेश्वर मंदिर यांची नोंद आहे. या मंदिरांची अवस्था बिकट आहे. तपोनेश्वर मंदिरात कळसावरून पाणी गळत आहे. दगडही सरकत आहेत. पांढरदेवी मंदिर, नेरच्या सोमेश्वर मंदिराचीही अशीच अवस्था आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या इतर मंदिरांचीही दैनावस्था आहे. दगडांची पडझड आणि कुंडांची पडझड पाहायला मिळते.
पुरातत्व विभागाकडे ताबा असलेल्या मंदिरात इतरांना हस्तक्षेप करता येत नाही. परंतु त्यांना त्यांच्या स्तरावर दुरूस्ती करता येते. त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या. मंदिरांचे वास्तूशिल्प जपावे.- ज्ञानेश्वर महल्लेविश्वस्त, तपोनेश्वर संस्थान