अविनाश साबापुरेयवतमाळ : जिल्ह्यातील सुकळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘आनंदी मुलांची बचत बँक’ हा उपक्रम शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या पसंतीस उतरला आणि मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मुख्याध्यापक अमोल पालेकर यांच्या संकल्पनेतून ही बँक साकारली आहे. मुले खाऊचे पैसे बँकेत जमा करतात, प्रत्येकाचे स्वतंत्र पासबुक आहे. बँकेत रोखपाल, व्यवस्थापक म्हणून विद्यार्थीच काम पाहतात. विद्यार्थ्यांच्या देखरेखीत ग्राहक भांडार चालते. पैसे काढून विद्यार्थी भांडारातून शैक्षणिक साहित्य खरेदी करतात.
‘आनंदी मुलांची बचत बँक’ सुकळीच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक अमोल पालेकर, सहायक शिक्षक संदीप कोल्हे यांनी मुलांसाठी ‘आनंदी मुलांची बचत बँक’ हा उपक्रम काही वर्षांपासून सुरू केला आहे. बँकेतील जमा, व्याज, शेकडा नफा याची माहिती आयुक्तांनी घेऊन खाते उघडले. मॅनेजर विद्यार्थ्याने त्यांना पासबुक दिले. हा उपक्रम राज्यातील इतर शाळांमध्ये राबविण्याचे सूतोवाच ही त्यांनी केले.
शंभराची नोटही जमा या बचत बँकेची माहिती राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या कानावर गेली. यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शाळा गाठून या बँकेत स्वत:चे खाते उघडले. फिक्स डिपाॅझिटचा फाॅर्म भरून शंभराची नोटही जमा केली नि विद्यार्थ्यांकडून पासबुक घेतले. ते घेऊन आयुक्त पुण्याला गेले अन् मुलांसाठी आनंदाची बचत ठेवून गेले.
गावकऱ्यांचेही कौतुकशिक्षण आयुक्तांनी प्रत्येक शाळेच्या शेरा बुकात गावकऱ्यांचे कौतुक केले. तिवसामध्ये शाळेसाठी जमीन दान देणाऱ्या गावकऱ्यांविषयी आनंद व्यक्त केला.
सुकळी येथील शाळेत विद्यार्थ्यांचे काैतुक करताना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे.
बँक खाते उघडल्याबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेली स्लिप.