रुग्णवाहिकेला बसची धडक : गरोदर मातेसह पाच जखमीयवतमाळ : गरोदर मातेला बाळंतपणासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एसटी बसने धडक दिली अन् गर्भातच चिमुकल्या जीवाने अखेरचा श्वास घेतला. या अपघातात गरोदर मातेसह पाच जण जखमी झाले. हा अपघात येथील दारव्हा मार्गावरील उमरडा नर्सरीत दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. बोरीअरब येथील सुचिता अनंता हरणे या गर्भवती मातेला बुधवारी कळा येवू लागल्या. त्यामुळे तिला रुग्णवाहिकाने (एम.एच.२९/ ए.टी.-००८१) यवतमाळ येथे दाखल करण्यासाठी घेवून जात होते. तिच्यासोबत पती अनंता हरणे, जाऊ वर्षा हरणे, आई कांताबाई चौधरी, भाऊ चितेश चौधरी रा.लिंगा रुग्णवाहिकेत होते. यवतमाळला जात असताना उमरडा नर्सरी घाटात दारव्ह्याकडे जाणाऱ्या एसटी बस एम.एच.४०/ए.क्यू.६२४४ ने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात गरोदर सुचितासह पती अनंता, जाऊ वर्षा, आई कांताबाई आणि चालक चंदन लांडे रा.लिंगा जखमी झाले. जखमींना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुचिताच्या डोक्याला जबर मार होता. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. अपघातातील धक्क्याने बाळाचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर तिला यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात गर्भपातासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताने जगात येण्यापूर्वीच एका चिमुकल्याला हिरावून नेले. (प्रतिनिधी)
अन् गर्भातच अखेरचा श्वास
By admin | Published: January 21, 2016 2:14 AM