ढाणकी : गाव आणि राव एकत्र आले तर काय चमत्कार होऊ शकतो, याचा प्रत्यय ढाणकी येथे आला. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेलं रस्त्याचं काम दोन दिवसात पूर्ण झालं. त्यामुळे नागरिकांनीही दिलासा मिळाला आहे. ढाणकी गावातून उमरखेड रोडला जवळच्या अंतराने जोडणारा हा जुना पांदण रस्ता होता. अनेक वर्षांपासून पडीक असलेला हा रस्ता फारसा वापरातही नव्हता. अनेकांनी या रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. शिवाय उकीरडे व घाणीचे साम्राज्यही याच रस्त्यावर पसरले होते. याच मार्गाने स्वामी पेंडसे विद्यालय, गाडगेबाबा आश्रमशाळा, आदिवासी आश्रमशाळा, टेंभेश्वरनगर आदी असल्यामुळे या सर्व लोकांना हा मार्ग खुला आणि प्रशस्त होणे गरजेचे होते. तसेच ग्रामस्थांनाही या मार्गाने उमरखेडला त्वरित जाता येणे शक्य होते. त्यासाठी रस्ता पक्का बनविणे अथवा रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक होते. याबाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. हा रस्ता व्हावा, अशी विद्यार्थी व पालकांचीही अनेक महिन्यांपासून इच्छा होती. या मार्गासाठी अखेरीस पाणी फाऊंडेशनने पुढाकार घेतला. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, सर्वपक्षीय राजकीय नेते आदींची एक बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत हा मार्ग त्वरित करण्यासाठी ग्रामपंचायतला प्रेरित करण्यात आले. सरपंच संजीवनी गुरवीरवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हा रस्ता तयार करण्यासाठी अनुकूलता दर्शविली. ग्रामविकास अधिकारी हिंगाडे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करता येईल, अशी माहिती दिली आणि लागलीच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. युद्धस्तरावर कामाला सुरुवात झाली या रस्त्यामुळे आता शालेय विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. रुग्णांना व वृद्धांना त्वरित रुग्णालयात पोहोचणे शक्य होणार आहे. या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण व्हावे व दुतर्फा नाल्यांचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
अन् रस्त्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला
By admin | Published: May 03, 2017 12:17 AM