अविनाश साबापुरे/यवतमाळ: प्रसूती ही एखाद्या कुटुंबासाठी जेवढी आनंददायी असते, तेवढीच जोखमीचीही असू शकते. अशावेळी डाॅक्टरच देव होऊन बाळ-बाळंतीणीला नवे जीवन देत असतो. येथील मेडिकलमधील ही घटना अशीच... बेशुद्धावस्थेत मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या एका गर्भवतीची सुखरूप प्रसूती करण्यात आली अन् तिच्या बाळालाही वाचविण्यात यश आले.
निशा शुद्धोधन जाधव (२५) असे या मातेचे नाव असून ती यवतमाळनजिकच्या मोहा फाटा येथील रहिवासी आहे. तिला ९ जून रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास बेशुद्धावस्थेत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाळंतपणासाठी भरती करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी केली असता तिला घरीच दोन वेळा झटके (काॅन्व्हलझन्स) येऊन गेल्याचे लक्षात आले. भरती झाल्यावरही आठ वेळा झटके आले. झटके आटोक्यात आणण्याचे सर्व उपचार करण्यात आले. तरीही झटके आटोक्यात येत नव्हते. निशाची स्थिती खूपच नाजूक होती. डाॅक्टरांनी तिला आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर ठेवले. परंतु रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या छातीत पाणीसुद्धा झाले होते. रुग्णाची बेशुद्धावस्थेतील स्थिती बघता तिचा जीव वाचविण्यासाठी सामान्य बाळंतपण करणे गरजेचे होते. परंतु गर्भातील बाळाचे ठोके कमी होऊ लागले होते. अशा जटिल परिस्थितीत निशाला बेशुद्धावस्थेत व्हेंटीलेटरवर ओटीमध्ये स्थानांतरित करुन सिझर करण्यात आले. तिला पुन्हा आयसीयूमध्ये स्थानांतरित करण्यात आले. मात्र बाळाची स्थितीही अतिशय नाजूक असल्यामुळे बाळाला एनआयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. पाच दिवसांनी निशाला हळूहळू शुद्ध यायला लागली. तिला व्हेंटीलेटरवरून काढून विशेष ऑब्झर्वेशन कक्षात हलविण्यात आले. तेथे चार दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले. दरम्यान तिचा रक्तदाब सामान्य होऊ लागला होता. बाळालासुद्धा व्हेंटीलेटरवरून काढून मातेकडे सुपूर्द करण्यात आले. बाळ व मातेची प्रकृती पूर्ण स्थिर झाल्यावर त्यांना रुग्णालयातून २६ व्या दिवशी सुटी देण्यात आली.
हा चमू ठरली देवदूत
निशा आणि तिच्या बाळाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयाची चमू अक्षरश: देवदूत ठरली. अधिष्ठाता डाॅ. गिरीश जतकर यांच्या मार्गदर्शनात प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डाॅ. क्षमा केदार, अन्य स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टरांची चमू डाॅ. अतुल पद्मावार, डाॅ. सुषमा गोरे (तारक), डाॅ. रजनी कांबळे, डाॅ. किरण धुर्वे (वट्टी), डाॅ. दिपिका धुंदी, डाॅ. प्रांजल खासबागे, डाॅ. मनु राजपूत, डाॅ. चैताली तसेच भूलतज्ज्ञ डाॅ. भूषण अंभोरे, चेस्ट मेडिसिन प्रमुख डाॅ. रवींद्र राठोड व टिम, मेडिसिनचे डाॅ. शेखर घोडेस्वार व टीम यांच्या प्रयत्नांनी दोन प्राण वाचू शकले.