यवतमाळ : जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उत्स्फूर्तपणे शिवसैनिक रस्त्यावर उतरला. जवळपास १३ तालुक्यातील शिवसैनिक सेनेसाेबत असल्याचे सांगत आहे. आता राजकीय घडामोड वाढली असून बंडखोर गटातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील शिवसेना आमदाराचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. अशा स्थितीत केवळ एका बाजूनेच बंडाच्या विरोधात आवाज उठविण्यात आला.
संजय राठोड समर्थकांकडून अद्यापपर्यंत प्रतिक्रिया आलेल्या नाहीत किंवा ठोस अशी भूमिकाही त्यांनी मांडली नाही. दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा क्षेत्रातून संजय राठोड यांना सावधपणे पाठिंबा दिला जात आहे. एकंदरच मंत्रिमंडळ स्थापनेच्या घडामोडीनंतर समर्थन की विरोध अशी भूमिका घेणारे सध्या शांत आहेत. बोलायला तयार नाहीत. विरोधातील होर्डिंग्ज यवतमाळात दोन दिवस झळकले, आता ही स्पर्धा थांबली आहे.
एकीकडे उद्धवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला.
दुसरीकडे शिंदेसेना
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ असलेल्यांनी अजूनपर्यंत जाहीर अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच ते बोलतील, असे दिसते.
इच्छुकांमध्ये वाढतोय संभ्रम
शिवसैनिकांनी जीवाचे रान करत पक्ष वाढविला. आता नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशा स्थितीत पक्ष दुभागला गेला. शिवसेना पक्षाचे अधिकृत चिन्ह व उमेदवारी आता कोणाकडून मिळणार, असाही संभ्रम स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सामान्य शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.
समर्थकांचे शक्तिप्रदर्शन
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी यवतमाळ, वणी, उमरखेड येथे रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले. शिंदे गटासोबत गेलेल्यांचा जाहीर निषेधही केला.
शिवसेनेसाठी घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. यामुळे सामान्य शिवसैनिक नाराज झाला असून आता त्याचा उत्साह मावळला आहे. समाजकारण व हिंदुत्वासाठी झटणारं संघटन कमजोर पडलं आहे. येत्या काळात नेते कशी उभारी देतात यावर सर्व अवलंबून आहे.
- डाॅ. दिनेश खेडकर
अजूनही पक्षश्रेष्ठींकडून निर्णय आलेला नाही. शिवाय, बाहेर पडलेले आम्ही शिवसैनिकच असल्याचे सांगत आहे. अशा स्थितीत सामान्य शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहे. अजून निर्णय आलेला नाही; मात्र एकंदर ही स्थिती पक्ष व शिवसैनिकांसाठी वेदनादायी आहे.
- गजानन इंगोले