यवतमाळ : येथील पंचायत समितीचा कारभार अनेक दिवसांपासून बेवारस आहे. पंचायत समितीमध्ये घरकूल लाभार्थ्यांची ठिकठिकाणी अडवणूक केली जाते. पदरमोड करून घराचे बांधकाम करणाऱ्यांना वेळेवर रोजगार हमी योजनेचे मस्टरही पुरविले जात नाही. हे मस्टर देण्यासाठीसुद्धा पैशांची मागणी होते. यामुळेच संतापलेल्या घरकूल लाभार्थ्यांनी मंगळवारी पंचायत समितीमध्ये धडक दिली. पहिल्या दिवशी पदभार स्वीकारलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना घरकूल लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त महिलांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला शाई फासली.
गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी सोमवारी पंचायत समितीचा पदभार स्वीकारला. मंगळवारी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक सुरू असतानाचा वाटखेड येथील घरकूल लाभार्थी महिला पंचायत समितीत पोहोचल्या. त्यांच्यासोबत दिगांबर अवथळे व आणखी काही लाभार्थी होते. या महिलांनी आपली कैफियत गटविकास अधिकाऱ्यांपुढे मांडली. घरकुलासाठी पंचायत समितीतील एपीओ स्नेहल खाडे, संगणक परिचालक मनीषा वानखडे, ग्राम रोजगार सेवक प्रकाश मेटकर हे त्रास देतात, रोजगार हमी योजनेचे मस्टर काढत नाही, जवळपास पाच महिन्यांपासून अडवणूक सुरू आहे. घरकूल लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. पावसाळा तोंडावर आहे. तरी तत्काळ मस्टर काढावे, अशी मागणी केली.
विशेष म्हणजे याच अडवणुकीची तक्रार लाभार्थ्यांनी २१ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. गटविकास अधिकाऱ्यांनी आताच पदभार घेतला, तुमची अडचण दूर केली जाईल, असे महिलांना सांगितले. मात्र बोलण्यातून वाद वाढला. महिलांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. दरम्यान, अवधूतवाडी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ठाणेदार मनोज केदारे यांनी दोन महिला, दिगांबर अवथळे व आणखी एकाला ताब्यात घेतले. कर्मचाऱ्यांनी दोषींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी करीत पंचायत समितीचे कामकाज बंद केले. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला.
कर्मचाऱ्यांनी केले काम बंद
गटविकास अधिकाऱ्यांना शाई फासल्याच्या घटनेनंतर पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह ४९ कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.