सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या ३० वर्षीय युवतीने घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून शनिवारी रात्री दुचाकीने प्रवास सुरू केला. जायचे कुठे हे माहीत नसताना ती यवतमाळजवळच्या मडकोना घाटात पोहोचली. तिथे तिच्या दुचाकीचे पेट्रोल संपले, मोबाईल स्विच ऑफ झाला. मध्यरात्री भररस्त्यात उभ्या असलेल्या तरुणीला ग्रामीण पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले.
नागपूर येथील एजन्सी प्लाझा पटेलनगर येथे राहणारी तरुणी एम.एच.३१/एसडब्ल्यू-७४४९ या दुचाकीने यवतमाळकडे निघाली. तिच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने मडकोना घाटात रस्त्याच्या बाजूला काळोखात बसून होती. हा प्रकार ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. नियंत्रण कक्षातून युवती बेवारस असल्याची सूचना ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय शिरभाते यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ मडकोना घाट गाठला. महिला पोलीस शिपायाच्या मदतीने त्या युवतीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता ती युवती कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हती. तिचा मोबाईल चार्ज करून संपर्क केला असता तिच्या कुटुंबीयांकडून ओळख पटली. ती युवती शनिवारी दुपारपासून घरून बेपत्ता होती. याप्रकरणी रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी गिट्टी खदाण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या सर्व गोष्टींची खातरजमा करून रविवारी त्या मुलीला ग्रामीण पोलिसांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.घरातील वाद नेमका कशासाठी, ही युवती एकटीच निघाली होती का आदी प्रश्न अद्याप कायम आहे.