सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार
फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच-उपसरपंचाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार मंगळवारी घडला.
गेल्या काही दिवसांपासून फुलसावंगी ग्रामपंचायत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. गावातील काही नागरिक मंगळवारी ग्रामपंचायतमध्ये तक्रारी घेऊन आले असता त्यांच्या तक्रारी ऐकून न घेता उपसरपंच व इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप करण्यात आला.
गाव नमुना आठ व मृत्यू नोंदी अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तसेच त्यांची कामे वेळेत होऊ दिली जात नाहीत असाही आरोप करण्यात आला. तसेच येथील ग्रामपंचायतमध्ये काही सत्ताधारी सदस्यांकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तुमची कामे कशी होतात हे आम्ही बघून घेऊ, असा उघड दम दिला जात आहे.
या सर्व समस्या सांगण्यासाठी जेव्हा गावातील नागरिक ग्रामपंचायतमध्ये आले, त्यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण न करता उपसरपंचासह इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप विजय महाजन यांनी केला. यावेळी विजय महाजन, अनुप नाईक, अमर दळवे, नसीर खान, समशेर लाला, योगेश वाजपेय, याकूब लाला, आरिफ लाला, शेख मजर, संदीप साखरे, शशिकांत नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.