कळंब (यवतमाळ) : येथे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांना आग लावण्यात आली. तत्पूर्वी दोन समाजातील गटात तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार बाभूळगाव येथील एका समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळंब ते बाभूळगाव रोडवरील धनोडा शिवारात वर्धा पासिंगचे चारचाकी वाहन रात्री ११ वाजेच्या सुमारास पकडले. या वाहनातून जनावरांची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. यानंतर एका समुदायाच्या कार्यकर्त्यांनी ते वाहन पोलिस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी कारवाईचा सोपस्कर पूर्ण केला. त्यानंतर वाहनातील जनावरे रासा रोडवरील गोरक्षण येथे पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. वाहनातील जनावरे खाली केल्यानंतर तेथे जवळपास १०० लोकांचा एका समाजाचा समुदाय दाखल झाला. त्यांनी जनावरांची तस्करी उघड करणाऱ्यांना बेदम मारहाण सुरू केली. काही क्षणात तस्करी करणाऱ्या वाहनाला आग लावण्यात आली. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्लेखोरांवर कारवाई करावी यासाठी दुसऱ्या समुदायाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस ठाण्यात गर्दी उसळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, वरिष्ठ पोलिस अधिकारी, एसआरपीसह विविध पथके दाखल झाली. सध्या शहरात जागोजागी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. मारहाणप्रकरणी येथील एका समुदायातील तीन लोकांना अटक करण्यात आली. जनावरांच्या तस्करीप्रकरणी चालकाला अटक करून इतर तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दोन्ही प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार आहे.
तीन पोलिसांची उचलबांगडी होणार
जनावर तस्करीत पोलिसांचे लागेबांधे असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात आला. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे प्रकरण हाताळण्यात हयगय करणाऱ्या आणि जनावरांच्या तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी केली जाण्याचे संकेत आहे. ते तीन पोलिस कोण, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.जनावर तस्करीचा विषय आणि गुरुवारची घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. यात दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई होईल. यापुढे जनावरांची तस्करी होणार नाही. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात येणार आहे. फरार आरोपी आणि ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग आहे, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.
शिरपूरला पोलिसांचा चेकपोस्ट
वर्धा-कळंबमार्गे जनावरांची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी शिरपूरच्या वर्धा नदीजवळ पोलिसांचा चेकपोस्ट निर्माण केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, कळंबच्या गोरक्षणाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास जनावर तस्करांच्या वाहनाला कोणी लावली, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. जाळपोळप्रकरणी अतिरिक्त गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली. अतिरिक्त बंदोबस्तासोबतच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अधिकृतपणे उघड केली नाही.