पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट
पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरेनामुळे दक्षता घेतली जात आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे जंगल होताहेत भकास
उमरखेड : तालुक्यात काही जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. अनेक जंगले भकास होत आहे. वनविभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. होळीमुळे वृक्षतोडीला जोर आला आहे.
रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना यातना
दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघात घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बिटरगाव परिसरात चिमुकले कामावर
बिटरगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना काम करावे लागते. आता पालकांसह चिमुकली मुलेही कामावर जात असल्याचे परिसरात दिसून येत आहे. अनेक रस्ता कामांवर चिमुकले खडी फोडताना दिसत आहे. त्यांचे बालपण कोमेजत आहे.
घाटंजी तालुक्यातून जनावरांची तस्करी
घाटंजी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पारवा पोलिसांनी ही तस्करी उघड केली. अनेक जनावरांची सुटका केली. मात्र, अद्यापही तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
आर्णी तालुक्यात पेटल्या हातभट्ट्या
आर्णी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या पेटल्या आहेत. पाेलसांनी यापूर्वी विविध ठिकाणी धाड टाकून मोहामाच, सडवा जप्त केला होता. विक्रेत्यांना अटकही केली होती. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दारव्हा तालुक्यात उद्योगांची वानवा
दारव्हा : तालुक्यात मोठ्या उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे बेरोजगारांना कामाच्या शोधात महानगरांकडे धाव घ्यावी लागते. बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, ओलिताअभावी आता शेती कसणेही अवघड झाले आहे.
लोणबेहळ शिवारात शेतकऱ्यांचे हाल
लोणबेहळ : गेल्या सप्ताहात परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. हातचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप पिकांनी आधीच दगा दिला होता. आता रबीतील पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.