जिल्हा परिषद : दोन्ही ठिकाणी प्रभारी, धोरणात्मक निर्णयात अडचणी यवतमाळ : जिल्हा परिषदेचे अत्यंत महत्त्वाचे आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असलेले आरोग्य आणि कृषी, हे दोनही विभाग सध्या वाऱ्यावर आहेत. या दोनही विभागांचे अधिकारी रजेवर असल्याने प्रभारींच्या खांद्यावर गाडा हाकला जात आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा विभाग म्हणून आरोग्य विभागाची ओळख आहे. मात्र सध्या हा विभाग अधिकाऱ्याविना पोरका झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.केझेड.राठोड महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. त्यांच्याविरूद्ध वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला. तत्पूर्वीच डॉ.राठोड रजेवर गेले आहे. त्यामुळे सध्या प्रभारीवर आरोग्याचा डोलारा उभा ठाकला आहे. कृषी विभागही सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी जगन राठोड हेसुद्धा गेल्या १५ दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांच्या रजा कालावधीतच कृषी समितीची बैठकही पार पडली. कृषी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. प्रभारी अधिकारी काही महत्त्वाचे आणि अडचणीचे निर्णय घेण्याचे टाळतात. परिणामी थेट शेतकऱ्यांवरच त्याचा परिणाम होतो. मात्र कुणाचेही याकडे लक्ष दिसत नाही. (शहर प्रतिनिधी) दोन्ही अधिकाऱ्यांची दीर्घ रजा सध्या पावसाळा सुरू आहे. साथीचे रोग आणि जलजन्य आजारांत वाढ होते. पावसाळ्यात विविध उपाययोजना आखाव्या लागतात. जनतेचे आरोग्य पावसाळ्यात धोक्यात सापडते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाच्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. मात्र ऐन साथ रोग आणि जलजन्य आजारांच्या काळातच या विभागाचे अधिकारी रजेवर असल्याने प्रभारावर जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे सध्या खरीप हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि विविध योजनांची गरज भासते. पेरणीपासून ते पिकांची चांगली वाढ होईपर्यंत शेतकरी कृषी विभागावर अवलंबून असतात. मात्र ऐन खरीप हंगामातच या विभागाचेही अधिकारी रजेवर आहे. डॉ. के. झेड. राठोड एक महिन्याच्या, तर जगन राठोड पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत रजेवर असल्याचे सामान्य प्रशासन विभागातून सांगण्यात आले.
ऐन हंगामात आरोग्य, कृषी वाऱ्यावर
By admin | Published: July 27, 2016 12:29 AM