राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूखंड घोटाळ्यातील भुमाफियांनी बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. या कर्जाचे पुढे कोण-कोण वाटेकरी बनले, याची नोंद बँकांच्या ‘स्टेटमेंट’मध्ये आहे. या नोंदीच आता भूखंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ने (विशेष तपास पथक) जाहीर कराव्या, अशी मागणी बँकांचे पाईक असलेल्या सामान्य सभासदांकडून जोर धरु लागली आहे. त्यासाठी लगतच्या भविष्यात एखादे आंदोलनही उभे करण्याची तयारी केली जात आहे.बेवारस भूखंड बनावट मालक उभा करून भुमाफियांनी परस्पर हडपले. पुढे या भूखंडांवर वेगवेगळ्या बँकांमधून कोट्यवधींचे कर्ज मंजूर झाले. बँकांनी कर्जाच्या या रकमा संबंधित कथित भूखंड मालकाच्या बँक खात्यात जमा केल्या. तेथून खऱ्या अर्थाने या रकमांना पाय फुटले. कोट्यवधींच्या या रकमांचे पुढे कोण-कोण भागीदार झाले, कुणा-कुणाच्या खात्यात त्या वळविल्या गेल्या, त्यापैकी किती रकमा कॅश झाल्या या सर्व नोंदी बँकांकडे आहेत. सुत्रानुसार, ‘एसआयटी’ने बँकांना या नोंदी असलेले स्टेटमेंट मागितले. त्यातील आकडे कुणाचेही डोळे विस्फारणारे आहेत. तीन कोटींच्या कर्जात कुणाच्या खात्यात २० लाख तर कुणाच्या खात्यात आठ लाख वळते झाल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या रकमा नेमक्या कोणत्या कारणावरून व कशाच्या मोबदल्यात वळत्या झाल्या यावर पोलीस तपास केंद्रीत होणे अपेक्षित आहे. ज्यांच्या खात्यात या रकमा वळत्या झाल्या तेसुद्धा या कोट्यवधींच्या बोगस कर्ज प्रकरणात सहभागी आहेत असे मानले जात आहे. त्यामुळे त्यांची नावेही आरोपी म्हणून रेकॉर्डवर घेतली जातात का, की त्यांना साक्षीदार बनवून ‘एसआयटी’कडून सूट दिली जाते, याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहेत.बोगस मालकी असलेल्या भूखंडाची अव्वाच्या सव्वा ‘व्हॅल्यू’ वाढवून त्यावर कोट्यवधींचे कर्ज मंजूर केले गेले. या प्र्रकारापासून बँकांचे कर्तेधर्ते व यंत्रणा अनभिज्ञ असण्याची शक्यता कमीच आहे. काही प्रकरणात ते ‘लाभांषधारक’ असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधींच्या या कर्जामागे राजकीय व गुन्हेगारी वर्तुळातील काही ‘मास्टर मार्इंड’ आहेत. त्यामुळे त्यांचीही नावे स्टेटमेंटमध्ये असू शकतात. म्हणूनच भूखंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ‘कर्तव्यदक्ष’ एसआयटी अधिकाऱ्यांनी बोगस कर्ज प्रकरणातील बँक स्टेटमेंटच माध्यमांसमोर जाहीर करावे, असे खुले आव्हान बँकांच्या सभासदांमधून केले जात आहे. ज्यांच्या हाती मोठ्या विश्वासाने सभासदांनी बँकेच्या तिजोरीची चाबी दिली, ते खरोखरच विश्वासपात्र आहेत काय? याची पडताळणी सभासदांना या जाहीर स्टेटमेंटच्या माध्यमातून करता येणार आहे. संबंधित बँकांच्या आगामी आमसभांमध्ये हे स्टेटमेंट गाजण्याची, त्याच्या प्रती मागितल्या जाण्याची चिन्हे आहेत. वेळ प्रसंगी त्यासाठी सभासदांनी आक्रमक होण्याचीही तयारी चालविली आहे.‘दुकानदारी’ची चाचपणीबँकांच्या स्टेटमेंटचे डिटेल्स पोलिसांकडे आहे. त्याच बळावर काहींनी कर्जाचे वाटेकरी झालेल्यांशी संपर्क करून ‘दुकानदारी’ची चाचपणी चालविल्याचीही माहिती आहे. ‘पहेलवान’ त्या बळावरच अद्याप सुरक्षित आहे. तर लाखोंची अवैध सावकारी करूनही पांढरकवडा रोडवरील नरेशचा ‘सुगंध’ अद्याप ‘लॉकअप’पर्यंत दरवळलेला नाही. नेहमीच्या ब्रोकरवर विश्वास ठेवल्याने भूखंड घोटाळ्यात यवतमाळ शहरातील एका नामांकित डॉक्टरची वाघापुरातील प्रॉपर्टीत फसवणूक झाली. मात्र या डॉक्टरला ‘तुम्ही माझ्यामुळेच अजूनही सेफ आहात’ असे सांगून पोलीस यंत्रणेतील ‘एका’ने ‘दुकानदारी’ केल्याची विश्वसनीय माहिती आहे.रविवारी आमसभाभूखंड घोटाळ्यात गाजत असलेल्या एका बँकेची रविवारी घाटंजीत आमसभा आहे. या आमसभेत बँकेचे पाईक असलेल्या सभासदांकडून बँक स्टेटमेंट मागितले जाण्याची, बोगस कर्ज प्रकरणांचा हिशेब विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट्यवधींच्या बोगस कर्जाचे बँक स्टेटमेंट जाहीर करा ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:59 PM
भूखंड घोटाळ्यातील भुमाफियांनी बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. या कर्जाचे पुढे कोण-कोण वाटेकरी बनले, याची नोंद बँकांच्या ‘स्टेटमेंट’मध्ये आहे. या नोंदीच आता भूखंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ने (विशेष तपास पथक) जाहीर कराव्या, अशी मागणी बँकांचे पाईक असलेल्या सामान्य सभासदांकडून जोर धरु लागली आहे.
ठळक मुद्देबँकांच्या सभासदांचे ‘एसआयटी’ला खुले आव्हान : सांगा, पैसा कुणाकुणाच्या खात्यात गेला ?