पांढरकवडा शहरात नाण्यांची टंचाई
पांढरकवडा : शहरात सध्या चिल्लर नाण्यांची टंचाई जाणवत असून ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहे. व्यावसायिकांनी तर चिल्लर ऐवजी चॉकलेट देण्याचा फंडा सुरू केला आहे. काही व्यावसायिक मात्र चिल्लर असूनही ग्राहकांच्या हाती पाच, सात रूपयांचे चॉकलेट ठेवत आहे. तर अनेक ग्राहक एक-दोन रूपये चिल्लर न घेताच परत जात असल्याचे चित्र आहे.
भरधाव वाहनावर नियंत्रणाची गरज
पांढरकवडा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून वाहने भरधाव जात असल्याने अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहे. या महामार्गावरील ट्रक सारखी वाहने तर प्रचंड वेगात असतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येथील वाहतूक पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या नावावर वसुली सुरू
पांढरकवडा : येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर त्याच विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत अवैध व्यावसायिकांकडून वसुली सुरू केलेल्याचे सांगितले जात आहे. या वसुलींच्या गोरख धंद्याबाबत काही वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचेही सांगितले जात आहे. अनेक कनिष्ठ कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडे चकरा मारताना ही दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आधारवरील मोबाईल क्रमांक बनले डोकेदुखी
मारेगाव : आधार कार्ड आता आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर फार अडचण येते. त्यातच आधार कार्डवर अनेक योजनेत मोबाईल नंबर आवश्यक असल्याने आता हा मोबाईल नंबर आधार कार्ड धारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकांनी ज्या सीमकार्ड कंपनीचा प्लॅन स्वस्त ते सीमकार्ड घेणे सुरू केल्याने अनेकांचे जुने मोबाईल नंबर आता बंद झाले आहे. त्यामुळे आता आधार कार्ड लिंक होत नसल्याने आधार कार्ड दुरूस्तीसाठी शहरात एकमेव असलेल्या पोस्टातील सेंटरवर नागरिकांची दुरूस्तीसाठी गर्दी होत आहे. आठ-आठ दिवस नंबर लागत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कामाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी आहे.
वीज चोरी वाढली ; कारवाईची मागणी
मारेगाव : तालुक्यातील अनेक गावात विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु याकडे वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबत महावितरणने कठोर पावले उचलून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
झुंजाईचा धबधबा ठरतोय आकर्षण
मारेगाव : तालुक्यातील वर्धा नदीवर असलेला झुंजाई येथील प्रेक्षणीय धबधबा सर्वांनाच आकर्षित करीत असून पर्यटकासाठी विशेषता तरूणांसाठी हा धबधबा आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी गर्दी वाढली असून सुरक्षेच्या दृष्टीने मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी बरेचदा याठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.