लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात चोरट्यांचा एकछत्री अंमल सुरू आहे. त्यांना वाटेल ते घर फोडायचे व मुद्देमाल पळवायचा, असा कार्यक्रमच हाती घेतला आहे. आर्णी मार्गावरील महाबलीनगरच्या घटनांची नोंद होत नाही तोच बुधवारी रात्री भोसा मार्गावरील सव्वालाखे ले-आऊटमध्ये घर फोडून चोरट्यांनी साडेतीन लाख रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांना पकडणे पोलिसांना शक्य होत नाही, हे यावरून दिसून येते.नीतेश गणेश कैथवास यांची भाजीमंडीत अडत आहे. कुटुंबातील लग्न असल्याने कैथवास कुटुंब बुधवारी दुपारी बल्लारशाह येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने समोरच्या दाराचा कोंडा तोडून साडेतीन लाखांची रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. वृत्त लिहिपर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती.
पोलिसांची रात्रगस्त ठरत आहे सोपस्कार- रात्रीच्या चोऱ्या, घरफोड्या थांबविण्यासाठी पोलीस पथक गस्तीवर असतात. तशा नोंदीही प्रत्येक पोलीस ठाण्यात योग्यरीत्या घेतल्या जातात. चोरी होऊ नये, यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्याचा कागदोपत्री पुरावा शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात आहे. प्रत्यक्षात मात्र पोलीस गस्तीवर असतानाही दररोज घरफोड्या होत आहेत. चोर पोलिसांच्या मागे फिरून चोरी करत आहे काय, असाही संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.