पांढरकवडा (यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य व्याघ्रसह इतर प्राण्यांच्या दर्शनासाठी नावरुपास आले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. मात्र अधिक प्रवेशद्वार नसल्याने पर्यटनाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यासाठी आणखी एक प्रवेशद्वार द्यावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यास यश आले. आता वन्यजीव विभागाने सुन्ना आणि माथनी या दोन प्रवेशव्दारा व्यतिरिक्त कोदोरी या नव्या प्रवेशव्दारालाही मान्यता दिली आहे.
टिपेश्वर अभयारण्यात व्याघ्र संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे टिपेश्वर अल्पवधीतच व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला. परिणामी तेथे पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. आतापर्यंत टिपेश्वरमध्ये प्रवेशासाठी सुन्ना आणि माथनी हे दोनच प्रवेशव्दार होते. सुन्ना येथून १७ तर माथनी येथून १२ अशा एकूण २९ जंगल सफारी वाहने धावायची. त्यामुळे पर्यटनाला संधी न मिळाल्याने अनेक पर्यटक परत जायचे. त्यामुळे आणखी एक प्रवेशव्दार खुले करावे, अशी मागणी पर्यटकांची होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांनी राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा केला. त्यात त्यांनी, पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर असून येथे रेल्वे स्टेशन आहे. तेथून पाच किमी अंतरावर पैनगंगा नदीवर चनाखा बॅरेज आहे. त्यामुळे तेथेही पर्यटकांची वर्दळ असते. त्याचा लाभ टिपेश्वर अभयारण्यात पर्यटक वाढण्यासाठी होऊ शकतो, ही बाब पालकमंत्री राठोड यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून पालकमंत्री संजय राठोड यांनी या मागणीसंदर्भात पांढरकवडा येथील वन्यजीव विभागाला निर्देश दिले. वन्यजीव विभागाने कोदोरी या नव्या प्रवेशव्दाराला मान्यता दिली. सोमवार, ३१ ऑगस्टला यासंदर्भातील आदेश वन्यजीव विभागाने काढले. त्या प्रवेशव्दारातून आठ जंगल सफारी धावणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून देण्यात आली.
या निर्णयामुळे टिपेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच या भागातील रोजगारही वाढणार आहेत. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांचे आभारही गजानन बेजंकीवार यांनी मानले आहेत.
गर्दीच्या मौसमात चार अतिरिक्त सफारी साधारणत: एप्रील, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधीत टिपेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या भरपूर असते. त्यासाठी पर्यटक अनेक दिवसांपूर्वी ऑनलाईन नोंदणी करतात. जास्तीत जास्त पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा आणि पर्यायानेच शासनाचा महसूल वाढावा या हेतूने वन्यजीव विभागाने एरव्ही टिपेश्वरमध्ये धावणाऱ्या ३७ जंगल सफारींमध्ये चार अतिरिक्त सफाऱ्यांची वाढ केली. त्या चार सफारी केवळ एप्रिल, मे आणि जून महिन्यातच टिपेश्वरमध्ये सेवा देतील, अशी माहितीही वन्यजीव विभागाकडून देण्यात आली.