चिमुकले राबतात : शिक्षणहक्क कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी नाहीपुसद : शिक्षणहक्क कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण करण्यात आले आहे. मात्र आजही शेकडो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येतात. तालुक्यातील अनेक चिमुकले विविध ठिकाणी राबताना दिसतात. अनेक मुले धोकादायक कामावर आई-वडिलांसह काम करताना दिसतात. त्यामुळे बालमजुरीविरोधी कायदा हा केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.१४ वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात अथवा इतर ठिकाणी कामाला ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु शहरात सर्रास बालकामगारांकडून लहान मोठी कामे करून घेतल्याचे दिसून येते. प्रशासनासमोर लहान मुले काम करताना दिसत असतानासुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. पुसद परिसरातील हॉटेल्स्, चहा टपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, रसवंती, पाणीपुरी स्टॉल, थंडपेयाची दुकाने इतकेच नव्हे तर विटभट्ट्या व इतर जोखीमीच्या ठिकाणी बालमजूर राबताना आढळतात. गारा तुडविणे, ओल्या विटा डोक्यावर वाहून नेणे आदी मेहनतीची कामे बालमजुरांकडून करून घेतल्या जाते. परंतु याबाबत कधीही धाडसत्र राबवून प्रशासनाकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. बालवयात मुलांच्या मनावर विविध धोकादायक कामांमुळे विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. जी कामे मुलांना पेलणार नाही, अशी कामेसुद्धा त्यांच्याकडून करवून घेतली जातात. मुलांना कामावर राबविणे गुन्हा असल्याचे माहीत असतानासुद्धा काही व्यापारी वर्ग पैसे वाचविण्याच्या नादात लहान मुलांना कामावर ठेवतात. (तालुका प्रतिनिधी)शेतीकामात अल्प मजुरीवर विद्यार्थीलवकरच खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. या काळात टोबणीच्या कामासाठी अल्प मजुरीवर विद्यार्थी राबतानाचे चित्र पुसद तालुक्यात नेहमीच दिसते. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले वेगाने काम करतात आणि मजुरीही कमी द्यावी लागते. त्यामुळे बहुतांश शेतात टोबणीचे काम चिमुकले करताना दिसतात. यात अनेक विद्यार्थी असतात. यातून शालेय साहित्य खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो.
पुसदमध्ये बालमजुरीविरोधी कायद्याचा फज्जा
By admin | Published: May 24, 2016 12:16 AM