२२ हजार लाभार्थी : अपात्र व्यक्तींकडे बीपीएलचे कार्डपुसद : शहरासह ग्रामीण भागात शिधापत्रिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याची ओरड असून श्रीमंत व्यक्तीकडे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीच्या शिधापत्रिका दिसत आहे. तर गरजू व्यक्ती, विधवा महिला तसेच मजूरवर्गाकडे मात्र अशा शिधापत्रिका नाही. परिणामी तालुक्यातील २२ हजार ७७९ एपीएल शिधापत्रिकाधारक तीन वर्षापासून धान्यापासून वंचित आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अनेक गोरगरिब बीपीएल शिधापत्रिकांपासून वंचित आहेत. यासोबतच स्वस्त धान्य दुकानांमध्येही धान्याचा काळाबाजार वाढत चालला आहे. स्वस्त धान्य दुकानदार मनमानी भावाने धान्य विकत असल्याच्या तक्रारी होत आहेत. रॉकेल विरणातील गैरप्रकारात तर दुकानदारांनी कळस गाठला आहे. शिधापत्रिका असणाऱ्यांना रॉकेल दिले जात नाही. दुसरीकडे काळ््याबाजारात मात्र रॉकेलची उघडपणे विक्री केली जात आहे. संबंधित अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकांकडून केला जात आहे. शिधापत्रिकाधारकांसाठीचे रॉकेल ट्रॅक्टर, काळी पिवळी जीप, आॅटोरिक्षा आदी वाहनांना विकले जाते. यामुळे प्रचंड प्रदूषण वाढत असताना कारवाई मात्र शून्य आहे. पुसद तालुक्यात ग्रामीण भागात १८३ व शहरी भागात १९ असे २०२ स्वस्त धान्य दुकान आहेत. त्यांच्या माध्यमातून ५२ हजार ६७ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करावे लागते. त्यात बीपीएल कार्ड धारक २१ हजार १८६, एपीएल कार्ड धारक २२,७७९, अंत्योदय कार्ड धारक ७८७३, अन्नपूर्णा कार्ड धारक २२९, शुभ्र कार्ड धारक २८२ आहे. तसेच २५४ रॉकेल विक्रेते आहेत. एपीएल शिधापत्रिकाधारकांना तीन वर्षापासून धान्याचा पुरवठा झाला नाही. याबाबत पुरवठा अधिकारी ए.के. शेख यांच्याशी अनेकदा संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (तालुका प्रतिनिधी)
‘एपीएल’धारक तीन वर्षांपासून धान्याविना
By admin | Published: September 01, 2016 2:36 AM