१९५ जागांची नोकर भरती : अर्जाला मुदतवाढ यवतमाळ : जिल्हा परिषदेत विविध १५ संवर्गातील १९५ जागांसाठी पदभरती घेतली जात आहे. या पदभरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज आले आहेत. गुरुवारपर्यंत आॅनलाईन अर्जाचा आकडा एक लाख १८ हजार इतका झाला आहे. यातून जिल्हा परिषदेकडे ९३ लाख रुपये जमा झाले आहे. मात्र १४ नोव्हेंबरपासून सातत्याने अर्ज अपलोड करण्यासाठी दिलेल्या साईडचे सर्व्हर डाऊन असल्याने अनेक उमेदवारांना अर्जच भरता आला नाही. अनक्षेपितपणे अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे पदभरती प्रक्रियेच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. अर्ज अपलोड करण्यासाठी विविध पदानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने पदभरती प्रक्रियासंदर्भात एका खासगी कॉम्प्युटर इन्स्टिट्युला काम दिले. मात्र या इन्स्टिट्युटच्या क्षमतेबाहेर अर्ज आल्याने नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. परिणामी आता अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची नामुष्की जिल्हा निवड समितीवर ओढवली आहे. ग्रामसेवक पदासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज अपलोड करता येणार आहे. २८ आणि २९ नोव्हेंबरला ज्या संगर्वाची परीक्षा आहे, त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे तर पैसे भरण्यासाठी २१ नोव्हेंबर ही मुदत दिली आहे. ज्या पदाची परीक्षा २५ नोव्हेंबरला आहे त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुदतवाढ दिली असली तरी अद्यापपर्यंत मात्र अर्ज अपलोड होत नसल्याच्या तक्रारी घेऊन उमेदवार जिल्हा परिषदेत धडकले होते. जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातूनच मोठ्याच प्रमाणात युवकांनी अर्ज केल्यामुळे १९५ जागांसाठी आतापर्यंत एक लाखांवर अर्ज आले आहेत. हा आकडा येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी सुटीच्या काळात अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी होती. १४ नोव्हेंबरपासून एकच गर्दी झाल्याने जिल्हा परिषदेचे सर्व्हरच डाऊन झाले. अद्यापही पूर्ण क्षमतेने हे सर्व्हर काम करताना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत एक लाखावर अर्ज
By admin | Published: November 20, 2015 2:52 AM