९० टक्के पेरणी : ‘आत्मा’चा निधी मिळालाच नाही, बियाणे तुटवड्याच्या प्रश्नावर चर्चा यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत गुरूवारी विविध साहित्य खरेदीला मंजुरी देण्यात आली. सभेत जिल्ह्यात खरिपाची ९० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षेतत ही सभा पार पडली. यात सेस फंडाचा आढावा घेण्यात आला. त्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार तीन एचपी, पाच एचपी, ७.५ एचपी, मोटार पंपासाठी एक कोटी पाच लाख, एचडीपीई पाईपसाठी ३५ लाख, पीव्हीसी पाईपसाठी ३७ लाख ५० हजार, डिझेल इंजिनसाठी १७ लाख ५० हजार, पॉवर स्प्र्रे, नॅपसॅक व बॅटरी आॅपरेटेड पंपासाठी प्रत्येकी ३५ लाखांची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे. तसेच ताडपत्रीसाठी १७ लाख ५० हजार, कृषी विभागाच्या फॉर्मच्या शेतसारा व फॉर्म लिलाव जाहीरात खर्चासाठी पाच हजार, पेरणी यंत्रासाठी एक हजार, सायकल कोणपोरठी एक हजार, अशी एकूण तीन कोटी ७५ लाख नऊ हजार रूपयांची तरतूद जिल्हा परिषदेने अंदाजपत्रकात केल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय सभेत जिल्ह्यात खरिपाची ९० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. सदस्यांनी बियाणे तुटवड्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता, सोयाबिनचे दीड हजार क्विंटल व कपाशी बियाण्याचेसुद्धा वाढीव पॅकेट मागविले होते, असे सांगण्यात आले. सभेत सोळाही तालुक्यात कृषी विज्ञान केंद्राचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. एमआरईजीएसतून चार हजार १३८ विहिरी पूर्ण झाल्या असून आठ हजार विहिरींचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विहीर पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असल्याचे सांगण्यात आले. दाल मिल, पोल्ट्रीकरिता ३० टक्के अनुदान असून दुधाकरिता चिलींग प्लॅन्ट योजना राबविणार असल्याचेही सभेत सांगण्यात आले. बॅकेच्या प्रतिनिधीने १५ आॅगस्टपर्यंत ४४ हजार २५४ सभासदांना २७६ कोटी ५८ लाखांचे कर्ज वाटप पूर्ण करण्याची ग्वाही दिली. दुधाळ जनावरे वाटप व अनुदानाबाबतही सभेत माहिती देण्यात आली. याशिवाय शेतीविषयक विविध प्रश्नांची चर्चा या सभेमध्ये करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
कृषी समिती सभेत साहित्य खरेदीला मंजुरी
By admin | Published: July 22, 2016 2:19 AM