या मार्गावरून शहरातून उमरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. बिल्डर लॉबीने शहरातील अनेक नैसर्गिक प्रवाह अडविले. प्रशासनाची त्याला मूक संमती असल्यामुळे असे नैसर्गिक प्रवाह शहरातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरू लागले आहेत. नागझरी नावाने बारमाही वाहणारा हा नाला आजही भूमीअभिलेख कार्यालयाच्या दस्तावेजावर नोंदलेला आढळून येतो. मात्र, बिल्डरांनी यंत्रणेला हाताशी धरून हा जुना नाला रेकॉर्डवरून नामशेष केला आहे.
शहरातील नागझरी हा एकमेव नाला आहे, असे नाही तर अनेक शासकीय जमिनी नैसर्गिक प्रवाह अडवून प्रशासनाच्या मदतीने गिळंकृत केल्या जात आहेत. स्थानिक तलाठी, मंडळाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि टाऊन प्लानिंगचा मंजुरी देणारा विभाग, हे सर्वच या व्यवहारात कारणीभूत ठरले आहेत. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून शहरातील किमान १५ ले-आउट रेड झोनमध्ये वसविण्यात आले आहे.