मारेगाव : शहरातील इंडियन ऑईल पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले असून, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
मारेगाव येथे वणी-यवतमाळ रोडवर इंडियन ऑइलचा पेट्रोलपंप आहे. परंतु या पेट्रोलपंपाचे मालक उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी विविध कारणे सांगून मनमानी करतात. पेट्रोलपंपाच्या वेळा ठरलेल्या असतानाही कर्मचाऱ्यांची अरेरावी चालते. शनिवारी सकाळी ग्राहकांची पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्या असताना हे कर्मचारी सकाळी ७ वाजेपर्यंत झोपून होते. काही ग्राहकांनी या कर्मचाऱ्यांना उठवून पंप सुरू करण्याची मागणी केली असता, मशीनच्या बॅटरी डाऊन असल्याचे कारण सांगून जवळपास ग्राहकांना अर्धा तास वेठीस धरण्यात आले. त्यामुळे अनेक ग्राहकांना परत जावे लागले. या पंपाचे काही कर्मचारी नेहमी ग्राहकांशी उध्दट वागतात, असा ग्राहकांचा अनुभव आहे. रुग्णवाहिकेलासुध्दा हे कर्मचारी वेळेवर पेट्रोल देत नाही. त्यामुळे अशा या कर्मचाऱ्यांना आता शिस्त लावण्याची मागणी होत आहे.