लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराला नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. तेच पाणी आपण घरात पिण्यासाठी साठवून ठेवतो. घराबाहेर पडल्यानंतर आपण बंद बाटलीतील पाणी पिण्यासाठी वापरतो. सर्रास बाटली घेऊन थेट पाणी पितो, परंतु ते पाणी शुध्द आहे का? याचा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. पावसाळ्यात पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेतली, तर आजारांना पळवून लावू शकतो.
राज्यात बोटावर मोजता येतील इतक्या पाण्याच्या कंपन्या मिनरल वॉटर पुरवतात. परंतु, परवाना नसणारे अनेकजण सर्रास बाटलीबंद पाणी विकतात. त्यामुळे गंभीर आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण पितो ते पाणी खरचं शुद्ध आहे का, याचा विचार करूनच पाणी पिल्यास संकट टाळता येऊ शकते. प्रवास असो की, कोणताही कार्यक्रम बॉटल बंद पाणी घेणे ही काळाची गरज झाली आहे.
यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे पाणी आले आहे. पण, नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याही पाणी विकत आहेत. काहीवेळा पाणी घेताना फसवणूक होऊ शकते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नावावर फसवूणक होते. जुन्या बाटलीत साधे पाणी भरून विकले जाते. मग, पाणी शुद्ध आहे, हे कसे ओळखावे. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल घेता, तेव्हा आयएसआय मार्कवर एक कोड असतो. (आयएस- १४५४३) हा कोड पाहिल्यावर बॉटल असली की नकली हे स्पष्ट होते.
असे ओळखावे पिण्यासाठी योग्य पाणीगुगल प्ले स्टोरवरून (बीआयएस केअर) अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर त्या बॉटलवरील कोडसंदर्भात सर्व माहिती मिळेल, तसेच हे पॅक कुठे झाले. त्याची माहिती मिळेल. अॅपमध्ये आयएसआय लिहिलेले असणार आहे. त्यावर व्हेरिफाय लायसन्स डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा. त्यावेळी दहा आकडी कोड मागितला जाईल. हा कोड बॉटलवर पॅकेजिंगवरून कॉपी करून टाकावा. कोड पाणी बॉटल पॅकेजिंगवर आयएसआय मार्कच्या खाली असतो. १० अंक असणारा कोड टाकल्यावर गो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सर्वच माहिती येईल, म्हणजेच हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही?, पाण्यात मिनरल्स आहेत की नाही ? यामुळे पाण्यापासून होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपासून सुटका मिळू शकते.