लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. यंदा ऊस लागवडीत तब्बल ९५६ हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यात मोजकेच साखर कारखाने असल्याने हा ऊस मराठवाड्यातील साखर कारखान्याकडे जात आहे. जिल्ह्यात यंदा उमरखेड तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. त्या खालोखाल महागाव तालुक्यात दोन हजार १०० हेक्टर, तर पुसद तालुक्यात एक हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी केवळ दोन सुरू असून दोन साखर कारखाने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगतच्या मराठवाड्यातील साखर कारखान्यांकडे आपला ऊस न्यावा लागतो. यात वाहतुकीसाठी जादा खर्च होत असल्याने ऊस उत्पादकांवर बोजा पडतो. तरीही यंदा पावसामुळे उसाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
नांदेड जिल्ह्यातील दोन ठिकाणी जातो ऊसजिल्ह्यातील दोन साखर कारखाने बंद असल्याने अतिरिक्त ऊस नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे जातो. यात कळमनुरी आणि हतगाव येथील साखर कारखान्यांचा समावेश आहे. हे दोनही तालुके पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्याला लागून आहे. त्यामुळे ऊस उत्पादक तेथील कारखान्यांना ऊस देतात.
यावर्षी उसाचे उत्पादन समाधानकारकयावर्षी उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली. परिणामी उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन जादा पैसे पडण्याची शक्यता आहे. यातून आर्थिक समाधान लाभणार आहे.- गोविंदराव देशमुख,सवना, ता.महागाव
कुठल्या कारखान्याने किती भाव जाहीर केला?जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या गुंज येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनीट-२ येथील कारखान्याने यंदा उसाला दोन हजार ४०० रुपये प्रती टन दर घोषित केला आहे. यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथील डेक्कन शुगर प्रा.लि. कारखान्यानेसुद्धा बऱ्यापैकी दर घोषित केल्याचे सांगितले जाते.