संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : येथील पटवारी कॉलनीतील एका घरावर शुक्रवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांच्या गळ्यावर चाकू लावत आलमारीतील सोन्याच्या दागिन्यांसह आठ लाख ८९ हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला. या घटनेने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांची संख्या पाच होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या शोधासाठी विविध पथके गठीत करण्यात आली असून शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधात परिसर पिंजून काढला. मात्र सायंकाळपर्यंत कोणतेही धागेदोरे गवसले नव्हते.
वणी शहरातील पटवारी कॉलनीतील रहिवासी सुभाष वासुदेव पिदुरकर हे वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना चार मुली असून पैकी तिघींचे लग्न झाले आहे. त्यामुळे सध्या सुभाष पिदुरकर हे त्यांची पत्नी लता पिदुरकर, पेशाने जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेली मुलगी मंगला पिदुरकर यांच्यासह पटवारी कॉलनीतील घरात वास्तव्याला आहे. गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हे सर्वजण जेवण करून ११ वाजताच्या सुमारास झोपी गेले. पहाटे २.३० वाजताच्या सुमारास अचानक घरातील बेडरूमच्या दरवाजाला लाथ मारण्याचा आवाज आल्याने सुभाष पिदुरकर, पत्नी लता पिदुरकर व मुलगी मंगला पिदुरकर यांनी उठून पाहिले असता, चार ते पाच इसम हातात चाकू घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. 'यहा से हिलना नाही, नही तो मार दुंगा' असे म्हणत पाचपैकी दोघांनी सुभाष पिदुरकर व मुलगी मंगला पिदुरकर या दोघांच्या गळ्याला चाकू लावला.
उर्वरित तिघांनी बेडरूममध्ये ठेऊन असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडले व त्यात ठेऊन असलेले आठ लाख ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच कपाटात ठेऊन असलेले रोख ४४ हजार रूपये काढून घेतले. सोबतच विविध बँकांचे बाँड, दोन पॉलीसीज, पोस्टाचे पासबूक व शिक्षिका असलेल्या मंगलाच्या शाळेच्या सहाव्या व सातव्या वर्गाच्या उत्तरपत्रिकाही दरोडेखोरांनी आलमारीतून काढून घेतल्या. त्यानंतर 'अगर पुलीस मे तक्रार दी तो तेरी लडकी को मार डालेंगे, वह कौनसे रोडसे आती जाती है, हमको मालूम है' अशी धमकी देऊन हे दरोडेखोर घराबाहेर पडले. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी दरोडेखोरांविरूद्ध भादंवि ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौघांच्या अंगावर काळे टी-शर्ट
पाचपैकी चार जणांच्या अंगावर काळे टी-शर्ट व फुलपॅंट असा त्यांचा पहेराव होता, तर एकाने अंगावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे चौकड्याचे शर्ट व फुलपॅंट असा पहेराव केला होता. सर्वांचे वय २५ ते ३० वर्षदरम्यानचे होते. बोलताना इकबाल अशा नावाचा ते उल्लेख करित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
दरम्यान, घटनेनंतर शुक्रवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बहेरानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने घटनास्थळावरून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.