लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/पुसद : ढाणकी येथे देशी कट्ट्यासह तरुणाच्या अटकेची शाई वाळते न वाळते तोच उमरखेड आणि पुसदमध्ये बंदूक, जीवंत काडतूस आणि धारदार शस्त्रासह तीन तरुणांना अटक करण्यात आली.उमरखेड येथे एक इसम पुसद येथून हत्यार घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांना मिळाली. त्यावरून ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने तहसील जवळ सापळा रचला. एका इसमावर पोलिसांचा संशय आला. त्याची झडती घेतली असता एक गावठी बंदूक, पाच जीवंत काडतूस, तीन चाकू आढळून आले. मुबलिक कय्यूम खान (२२) रा. वसंतनगर पुसद असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे ढाणकी येथे देशीकट्ट्यासह त्याला ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्यानंतर सोमवारी पुन्हा उमरखेडमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुसद येथील अली अबरार अहमद उर्फ बबलू इकबाल अहमद याला ९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरून उमरखेडच्या परवेज खान सलीम खान याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी १२ बोअरची बंदूक जप्त करण्यात आली होती. या दोघांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून काळीदौलत येथील शबीर खान रऊफ खान याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी एक बंदूक, सांबरचे शिंग, बंदुकीचे सुटे भाग, एक १२ बोअर, दोन नळीची बंदूक जप्त करण्यात आली. तसेच पुसद येथील वसंतनगरातील अजहर खान सलीम खान याच्या घराची झडती घेतली असता एक भरमार बंदूकर, एअर रायफलचे पॅलेट, दोन तलवार, एक गुप्ती, दोन खंजर, मोठे चाकू, दोन लहान चाकू, फायटर आढळून आले. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली.
उमरखेड, पुसदमध्ये शस्त्रसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:04 PM
ढाणकी येथे देशी कट्ट्यासह तरुणाच्या अटकेची शाई वाळते न वाळते तोच उमरखेड आणि पुसदमध्ये बंदूक, जीवंत काडतूस आणि धारदार शस्त्रासह तीन तरुणांना अटक करण्यात आली.
ठळक मुद्देएसडीपीओंची कारवाई : बंदूक, जीवंत काडतूस, चाकुचा समावेश