नेर (यवतमाळ) : तालुक्यातील संपुर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांना आसमानी संकटासह विविध समस्यांनी घेरले आहे. अगोदरच शेतकऱ्यांनी पेरणी करून सुद्धा त्यावर पाऊस न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पीके खरडुन गेल्याने पुन्हा पेरणी करावी लागली. आता पीक कसेबसे तग धरून असताना त्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनच्या झाडाची पाने या अळ्या फस्त करत आहे. पिकाचे संरक्षण कसे करावे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
पीक परिस्थिती सुधारित असताना सततधांर पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने पाहणी केली. शेतकरी हा दोन महिन्यापासून संततधार पाऊस असल्याने चिंतातुर होता. यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या शेतात जमिनीसह पिके खरडून गेली. या नैसर्गिक संकटामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. हे संकट काहीसे दूर होत नाही तर तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात आली. पीक वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना अतोनात प्रयत्न करावे लागत आहे.पिकांची परिस्थिती चांगली असतानाच सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे आहे.
शेतकऱ्यांना शेतातील पीक घरी येईल की नाही याची चिंता वाटत आहे. यावर्षी पेरणीच्या काळात उगवलेल्या कोवळ्या पिकांवर गोगलगायीने सुद्धा हल्ला केला होता. यातून कसेबसे पीक वाचविले. आता सोयाबीन पीक लष्करी अळी फस्त करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने सरसकट शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. या गावांमध्ये अळीचा सर्वाधिक प्रकोपआता तालुक्यातील परजना, अडगाव, पांढरी ,खोलापुरी, शिरजगाव खानापूर, खरडगाव, दोनद, उमरठा इतर शिवारातील शेतकऱ्यांना अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कीटकनाशकाचे फवारे करूनही अळी नियंत्रणात येताना दिसत नाही. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मात्र या संकटाबाबत कुठल्याही उपाययोजना सांगितल्या जात नाही.