लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या अनेक चेहऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात हे सर्व प्रमुख चेहरे एकाच व्यासपीठावर आल्याने त्याची चर्चा सुरू झाली.आर्णी विधानसभा मतदारसंघ प्रा. राजू तोडसाम यांच्या रुपाने भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघावर एक-दोन अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या सर्वेक्षणात आर्णी मतदारसंघ रेड झोनमध्ये असल्याचे अनेक महिने सांगितले जात होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहीर यांना ५७ हजार मतांची आघाडी मिळवून देऊन आमदार तोडसाम यांनी रेड झोनची चर्चा खोटी ठरविली. या आघाडीने तोडसाम यांच्या फेर उमेदवारीतील संभ्रमही दूर झाला. तरीही भाजपातील काही मंडळी आर्णी विधानसभेची तिकीट मिळविण्यासाठी उत्सुक व इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही चालविली आहे. काहींनी संघाचे ‘कन्सेन्ट’ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तोडसाम रिपीट होऊ नये म्हणून भाजपातूनच त्यांची जुनी प्रकरणे उकरुन काढून श्रेष्ठींकडे त्यांच्या प्रतिमेला उजाळा देण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘ऐन निवडणुकीच्या वेळी’ पुन्हा पोलिसात अर्जफाटे-तक्रारी तर होणार नाही ना, अशी हूरहूरही तोडसाम समर्थकांमध्ये पहायला मिळते. ते पाहता तोडसाम यांना आधी उमेदवारी व नंतर विजयासाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार म्हणून अॅड. शिवाजीराव मोघे टॉपवर आहेत. युवकांच्या फळीतून त्यांचा मुलगा जितेंद्र मोघेसुद्धा उमेदवारीसाठी धडपडतो आहे. आतापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसमध्ये मोघेंच्या नावाने ओळखला जायचा. परंतु आता पक्षातून उदयास आलेल्या नेतृत्वाची डोकेदुखी मोघेंपुढे वाढली आहे. सध्याच सहा ते सात जणांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. ते पाहता मोघेंना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे दिसते. पक्षाने वयाचा मुद्दा उपस्थित केल्यास शिवाजीराव मोघेंकडे मुलगा जितेंद्रचा पर्याय आहे. मात्र घराणेशाही म्हणून पक्षातून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आर्णी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी युतीतील वाटाघाटीत या मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. सेनेकडे अद्याप लोकप्रिय चेहरे उपलब्ध नसले तरी ऐनवेळी काहींना रिंगणात उतरविण्याची तयारी केली जात आहे. त्यात एका शिक्षक कम नेता, महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. या मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसनेही चाचपणी चालविली आहे. पक्षातील एका महिला पदाधिकाºयाला निवडणुकीसाठी आर्णीची दिशा दाखविली गेली आहे. आर्णी तालुक्यात पक्षाचे विधान परिषद सदस्य असल्याने त्यांच्या माध्यमातून विधानसभेचा आखाडा गाजविण्याची राष्टÑवादीची व्युहरचना आहे.एकूणच आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांना आपले तिकीट आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे बराच घाम गाळावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षातून अनेक नवीन चेहरे मतदारसंघात अचानक फिरताना दिसत असल्याने त्यांचा मनसुबा मतदारांच्या नजरेतून लपलेला नाही.नवख्यांना पक्षांतर्गत विरोधकांचे ‘टॉनिक’काँग्रेसमधून अर्ध्या डझनावर नवे चेहरे आर्णी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यातील काही चेहऱ्यांना बरीच मर्यादा आहे. मात्र त्यांना पक्षातील विरोधकांकडून कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने ‘टॉनिक’ दिले जात असल्याने ते उघडपणे मोघेंच्या उमेदवारीला आव्हान देताना दिसत आहे. कालपर्यंत मोघेंचा झेंडा हाती घेणारे हे कार्यकर्ते अचानक विरोधात उभे झाले कसे, याचे आत्मचिंतन करून त्यांचे रिमोट नेमके कुणाच्या हाती याचा शोध साहेबांनी घ्यावा, असा सूर मोघे समर्थकांमधून ऐकायला मिळतो आहे.
आर्णीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, शिवसेनेचाही दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 9:22 PM