हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील सामान्य कुटुंबातील गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड सुरू आहे. मात्र कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले.गजानन हा येथील सामान्य नाभिक कुटुंबातील युवक. २०१७ मध्ये बारावीत चांगले गुण घेतल्याने त्याची गुणवत्तेच्या आधारावर डेन्टीस्ट (दंत चिकित्सक) अभ्यासक्रमासाठी नागपूर येथील डेंटल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये निवड झाली. त्याच्या वडिलांचे आर्णीत छोटेसे सलून आहे. त्यावरच ते कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यामुळे गजाननचा शिक्षण खर्च कसा पेलायचा, अशी त्यांना चिंता पडली. त्यांनी घर गहाण ठेवून कर्ज घेतले. गजाननचे शुल्क भरून त्याला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी रवाना केले. मात्र इकडे भाड्याच्या दुकानाचे मालक बदलले. दुकान दुसऱ्या मालकाने घेतल्याने त्यांना सलून बंद करावे लागले. यामुळे आर्थिक घडी विस्कटली.काही महिन्यानंतर पुन्हा तेच दुकान भाड्याने घेतले. मात्र आर्थिक घडी बसविणे कठीण झाले. गजाननला वेळेत पैसे पोहोचणे अवघड झाले. वडिलांनी ही स्थिती मुलाला कळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांची घुसमट गजाननच्या लक्षात आली. यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याची अस्वस्थता नैराश्येत बदलली. शिक्षण अर्ध्यावर सोडून गजानन गावी परतला.गजाननची घुसमट अनेकांच्या लक्षात आली. वडिलांच्या एका मित्राने त्याला बोलते केले. त्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला यवतमाळच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. अखेर गजानन नैराश्यतेतून बाहेर आला. आता त्याला पुन्हा उमेदीने उभे होऊन दंत चिकित्सक व्हायचे आहे. यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील संवेदनशील व दातृत्वशील लोकांनी समोर येऊन त्याला मदत करण्याची गरज आहे. मदतीचे हात पुढे सरसावल्यास एका गरीब मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.पैशापुढे गुणवत्ता फिकीगजानन गुणवत्तेवर डॉक्टरकीसाठी निवडला गेला. मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्याची गुणवत्ता फिकी ठरली. वडिलांच्या तगमगीने त्याला नैराश्यतेत लोटले. परिस्थितीपुढे नमलेल्या गजाननने पुन्हा उभारी घेतली. मात्र आर्थिक अडचण कायम आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च वडील पेलू शकत नाही. त्यामुळे या गुणी युवकाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कोमेजणार तर नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आर्णीच्या गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:36 IST
येथील सामान्य कुटुंबातील गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड सुरू आहे. मात्र कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले. गजानन हा येथील सामान्य नाभिक कुटुंबातील युवक.
आर्णीच्या गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड
ठळक मुद्देआर्थिक अडचण : नैराश्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच थांबले