लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : रंगपंचमीच्या दिवशी नाचण्याच्या वादातून एका युवकाला तीन युवकांनी चाकूने भोसकले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील गणपती मंदिर चाैकात घडली. अतिष महादेव ढोले (३०, रा. आर्णी) असे मृत युवकाचे नाव आहे. चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गणपती मंदिर चाैकात त्यांच्यात नाचण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिघांनीही अतिषला चाकूने भोसकले. काही वेळातच अतिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची गर्दी झाली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अतिषला उपचारासाठी रवाना केले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी पळून जात होते. त्यापैकी रोहन मनोज सोयाम हा जमावाच्या हाती लागला. जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणी मृतक अतिषच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. त्यात चाैघांनी आपल्या भावाला मारल्याचे नमूद केले. पोलिसांनी तूर्तास भादंवि ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटकही केली आहे. यातील चाैथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी शुक्रवारी रात्रीच भेट दिली. दरम्यान या घटनेतील आरोपी चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्णी शहर आणि तालुक्यात खुनाच्या घटना वाढल्या आहे. मानवी नावाच्या चिमुकलीच्या हत्येने सुरू झालेले हे सत्र सुनेने केलेल्या गोळीबारानंतर तरी पोलीस रोखतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून आतापर्यंत तब्बल पाच जणांचा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खुनाची मालिका सुरूच- आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.