प्रतिबंधात्मक कारवाई : घरात जाऊन धमकाविले यवतमाळ : शहरातील डॉक्टरला घरी जाऊन १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. जागेच्या ताब्यावरून वाद घालत थेट जीवे मारण्याची धमकी आरोपीने संबंधित डॉक्टरला दिली होती. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विकास येडशीकर यांनी येथील वीर वामनराव चौक परिसरात प्रकाश जुळे यांच्याकडून ३५१ फूट जागा खरेदी केली. याच जागेतील १०५ चौरस फुटाबाबत जुळे यांचा हसमुख लोढीया याच्याशी वाद सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी विक्की राय आणि त्याच्या सहकाऱ्याने डॉ. विकास येडशीकर यांच्या घरी जाऊन त्यांना १५ लाखांची खंडणी मागीतली, पैसे न दिल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सतत खंडणीसाठी आरोपींकडून तगादा सुरूच होता. यामुळे धास्तावलेल्या डॉ. येडशीकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. त्यावरून आरोपी विक्की राय याच्या विरोधात खंडणी मागणे, घरी जावून धमकावणे या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली. शनिवारी न्यालयात हजर केले असता आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. यापूर्वीसुध्दा अनेक गंभीर गुन्हे आरोपीवर असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
डॉक्टरला १५ लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक
By admin | Published: August 09, 2015 12:03 AM