अविनाश खंदारे
फोटो
उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात वसलेल्या ४० गावातील वाहतूक बिटरगाव मार्गे होते; मात्र, बिटरगाव ते ढाणकी मार्गावरील आर्टी येथील नाल्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे.
हा मार्ग पुढे तालुका, जिल्हा मार्गाला जोडला जातो. हा रस्ता सर्व गावांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. पावसाळ्यात आर्टीच्या नाल्याला पूर येतो. या पुलाची उंची खूपच कमी आहे. दोन्ही बाजूंनी कोल्हापुरी बंधारा आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी नाल्याला पूर येतो. पुलावरून पाणी वाहते. परिणामी ४० गावांतील वाहतूक ठप्प पडते. पुढे जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने अनेकांना धडपडत प्रवाहाच्या विरोधात वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.
अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पुरातून जाताना एकमेकांच्या हाताला धरुन मार्ग काढावा लागतो. यात बरेचदा प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिला, इतर गंभीर आजारांचे नागरिक असतात. त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जायचे असल्यास पुलावरील पाणी कमी झाल्याशिवाय जाता येत नाही. यामुळे गंभीर आजार असल्यास रुग्णाला त्याच ठिकाणी जीव गमवावा लागतो. सर्व गावांना जोडणारा दुवा म्हणजे हाच एकमेव मार्ग आहे.
बॉक्स
खड्ड्यांमुळे गेले अनेकांचे जीव
अनेक वर्षांपासून बंदी भागातील ४० गावांतील नागरिकांच्या नशिबी खड्डे पाचवीलाच पुजले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडत आहे. या परिसरातील रस्ते व नाल्यांच्या दुरवस्थेमुळे आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. अजून किती जीव जाणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे अनेकदा दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांमधून जाणाऱ्यांना पाठदुखीचा त्रास सतावतो. मणक्याचे आजार बळावतात. महिलांच्या मुदतपूर्व प्रसूतीस हे खड्डे कारणीभूत ठरतात. आर्टी येथील नाल्यावरील पुलाकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या मार्गांवरील वाहतुकीसाठी ठरणारा अडथळा दूर करावा, अशी अपेक्षा आहे.