यवतमाळ : निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करूनही पुन्हा नव्याने उमेदवारीसाठी धडपड करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगलेच कान टोचले. जनतेला जुन्या चेहऱ्यांचा विट आला असून ज्येष्ठांनी आता थांबले पाहिजे, त्याऐवजी तरुण नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.
विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांचा सत्कार आणि पश्चिम विदर्भीय कार्यकर्ता मेळावा शनिवारी येथे पार पडला. यात मंत्र्यांनी जोशपूर्ण भाषणे करून कार्यकत्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत याचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाषणांमधून कुणी व्यथा मांडला तर कुणी पक्षाला नवी दिशा दिली. तर अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या तमाम नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार मांडले.
चव्हाण म्हणाले की, एकेकाळी यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांमध्ये केवळ काँग्रेसच निवडून येत होती, आमच्या नांदेड जिल्ह्यातील ही पत राखली, मात्र यवतमाळला गेल्या काही निवडणुकांमध्ये ही पत राखता न आल्याने काँग्रेसचा हा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला. यामागील कारणे शोधले असता तेच ते चेहरे आणि प्रत्येक निवडणुकीत एकाच चेहऱ्याला तिकीट ही बाब प्रकर्षाने पुढे आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
तर लोकांना या जुन्या चेहऱ्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही, ज्येष्ठ नेत्यांनीही काहीशी उसंत घेऊन आता थांबले पाहिजे, नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांच्या या वक्तव्याचे सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.अशोक चव्हाण यांचे हे वक्तव्य यवतमाळ जिल्ह्यात तंतोतंत खरे ठरत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्यातील नेत्यांपैकी कोण किती वेळा कोणती निवडणूक हारले याचा हिशोब आपसातील चर्चेत मांडणे सुरु झाले होते.