यवतमाळ: आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला. मात्र हे वेळापत्रक जाचक असल्याचा आरोप करीत आश्रमशाळा कर्मचारी १० जुलै रोजी राज्यभरात निषेध दिवस पाळणार आहेत.
शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना व संलग्नित अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात येत आहे. १० जुलैपासून लागू होत असलेल्या अन्यायकारक वेळापत्रकाचा यावेळी विरोध केला जाणार आहे. निर्धारित आंदोलनाचा पहिला टप्प्या म्हणून १० जुलैला नवीन वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवशी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
तसेच संघटनेचे सर्व विभागीय अध्यक्ष अपर आयुक्तांना तर कल्प अध्यक्ष प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त या सर्वांना एकाच दिवशी निवेदन पाठविणार आहेत. महाराष्ट्रभरातील शाळा पातळीवर सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत यांनी केले.
आदिवासी विकास विभागाचे प्रस्तावित वेळापत्रक विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांसाठी गैरसोयीचे आहे. आश्रमशाळेच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आलेला नाही. निवासी विद्यार्थ्यासोबतच अनिवासी विद्यार्थी, शिक्षण सवलत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या वस्त्यांमधून आश्रमशाळेत येत असतात. नवीन वेळापत्रकामुळे त्यांना शिक्षण घेणे गैरसोयीचे होईल. तसेच इयत्ता १ ते ४ मधील लहान मुलांना पहाटे उठून तयारी करणे अडचणीचे होईल. विद्यार्थीहिताचा विचार करून नवीन वेळापत्रक लागू करण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने घेतली आहे.