यवतमाळ : मारेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुलमेथे यांच्या खुनातील फरार आरोपी अनिल मेश्रामला अखेर 20 दिवसानंतर अटक करण्यात आली. पांढरकवडा पोलिसांनी हिवरी या गावातील मंदिरातून रविवारी त्याला अटक केली. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे हे सोमवारपासून वार्षिक निरीक्षण सुरु करणार आहेत.
25 नोव्हेंबर च्या रात्री कोर्टाचा वॉरंट ताब्यात घेण्य़ासाठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर आरोपी अनिलने हल्ला केला होता. त्यात एएसआय कुलमेथे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हल्ल्यासाठी मदत केली म्हणून आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली होती. पोलिसांचा खून करणाऱ्या या आरोपीच्या अटकेसाठी यवतमाळच्या 250 पोलिसांची फौज मरेगावच्या जंगलात तैनात करण्यात आली होती.
पोलिसांचा मारेकरीच पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांवर समाजातून टीका होत होती. पांढरकवडाचे ठाणेदार शिवाजी बचाते यांच्या स्कॉडने आरोपी अनिलला रविवारी सायंकाळी अटक केली. आरोपी पेशाने गुराखी होता.