दारव्हा : शहराच्या विकासाकरिता विविध योजनेंतर्गत येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तयार करा, आपण निधीच्या स्वरुपात आवश्यक तेवढे सहकार्य करू असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी रविवारी दिले. नगरपरिषदेमध्ये कामांचा आढावा घेण्याकरिता आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक चिरडे, उपाध्यक्षा माधुरी गडपायले, काँग्रेसचे गटनेते सैय्यद फारूक, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अ. रहेमान शेखजी, शिक्षण सभापती इंगोले, बांधकाम सभापती अलीमहंमद सोलंकी, नियोजन सभापती जितेंद्र नांदे, मुख्याधिकारी जी.एस. पवार, नगरसेवक हरिभाऊ गुल्हाने, सुशील राठोड, हाजी मोबीन खान, जब्बार कुरेशी, मो. शोएब पहेलवान बंडू डोंगरे, प्रकाश उरकुडे, त्र्यंबक निमकर, मुजफ्फर खान आदी उपस्थित होते. पुढे बालेताना ना.डॉ. पाटील म्हणाले की, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकडे गांभीर्याने द्या, शौचालयाची संख्या वाढवा त्याकरिता निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्याचबरोबर दलित वस्ती, अल्पसंख्यांक भागात विकास कामे करणाऱ्यांच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या शाळांची प्रशंसा केली. शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे, असे ते म्हणाले. तत्पुर्वी बोलताना नगराध्यक्ष अशोकराव चिरडे यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी प्रशासकीय कामकाजाची माहिती दिली. नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांचा नगराध्यक्ष अशोकराव चिरडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
शहराच्या विकासाकरिता गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
By admin | Published: January 11, 2016 2:20 AM