वडकी (यवतमाळ) : नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वडनेरवरून कंटेनर निघाला. त्यातून कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे, अशी खबर वडकी पोलिसांना शनिवारी पहाटे ६ वाजता मिळाली. दहेगाव फाट्यावर सापळा रचण्यात आला अन् ३० रेड्यांना जीवदान देण्यात आले.
वडकीचे ठाणेदार विजय महाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहेगाव फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. मिळालेल्या माहितीत सांगितलेल्या वर्णनाची तपासणी करण्यात आली. आरजे ११-जीसी ०२०३ या वाहनाच्या तपासणीत ३० रेडे आढळले. या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. वडकी पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.
कंटेनर चालक दिलशाह इनाम (३५, रा. किदनईनगर जि. मुजफ्फरनगर, उतरप्रदेश), जम्मा सुबेदिन (४२, रा. पचानका, ता. हथीम जि. पलवल हरियाणा) या दोन जणांविरुद्ध प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरुन रेडे व वाहनासह ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३० रेड्यांना श्रीराम गोशाळा (रासा, ता. वणी) येथे सोडले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय महाले, विलास जाधव, विकेश धावर्तीवार, विनोद नागरगोजे आदींनी पार पाडली.