लोकमत न्यूज नेटवर्क वणी: अनेक जण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, ऑनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. गुगल-पे, पेटीएमसह अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने वणीतील एटीएममध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार नागरिक झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्यामुळे शहरासह गावखेड्यामध्येही ऑनलाइन व्यवहार करण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. लहान-मोठी खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला रोकड न देता वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन भरणा केला जात आहे.
मोबाइलच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी भीम अॅप, गुगल-पे, पेटीएम, फोन-पे यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी वेगवेगळे अॅप डाउनलोड करून घेतले आहेत. यूपीआय अंतर्गत येणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या खुबीने केला जात आहे. मोबाइलच्या माध्यमातून पेमेंट करणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. पैसे हरविण्याची भीती नसते. शिवाय खिसेकापूंचीही भीती राहत नाही. ऑनलाइन व्यवहारामुळे बँकेतून रोकड काढणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी याचा सर्वाधिक परिणाम एटीएमवर झाला आहे. एकेकाळी रोकड काढण्यासाठी ग्राहकांनी गजबजलेल्या एटीएममध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एटीएम किंवा बँकेत जाऊन वेळेचा अपव्यय करण्याची इच्छा नागरिकांमध्ये राहिलेली नाही. ज्या एटीएममधून रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली आहे, अशा ठिकाणचे एटीएम बंद केले जात आहे.
ऑनलाइन व्यवहारामुळे बँकांची होतेय बचतडिजिटल पेमेंटमुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बँकेला एटीएमवर प्रत्येक महिन्याला ५० ते ६० हजार रूपये खर्च करावा लागत होता. त्यात १० ते १५ हजार रुपयांप्रमाणे दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, तसेच मशीनमध्ये पैसे भरणे तसेच विजेच्या बिलावरही मोठा खर्च करावा लागत होता. आता एटीएमवर फारसा खर्च करावा लागत नसल्याने बँकांची आर्थिक बचत होताना दिसत आहे.