लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील उमरसरा परिसरातील छत्रपती सोसायटीमध्ये निसर्गोपचार केंद्र चालविणाऱ्या एका डाॅक्टरने महिलेचे शोषण केले. उपचारासाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवून नंतर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. गणेश मुरलीधर साठे (३५, रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक, जुना उमरसरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने पीडित महिला २०१७ मध्ये डाॅ. गणेश साठे याच्या नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये गेली. तेव्हा तिला सलग १२ महिने उपचार घेतल्यानंतरच आराम मिळेल, असे सांगण्यात आले. ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डाॅ. साठे याची पत्नी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करीत होती. त्या अवस्थेत साठे याने वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ काढले. नंतर या व्हिडिओच्या आधारे डाॅ. साठे हा सातत्याने शोषण करू लागला. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. इतकेच नव्हे तर डाॅक्टरच्या या कृत्यात त्याची पत्नीही त्याला मदत करीत असल्याचा आरोप पीडितीने केला आहे. तिच्या या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी डाॅ. गणेश साठे याच्याविरुद्ध कलम ३७७, ३७६ (२) (न), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डाॅक्टरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
डाॅक्टरच्या पत्नीचीही पीडितेविरोधात तक्रार- पीडित महिलेविरोधात डाॅ. गणेश साठे याच्या पत्नीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेविरोधात कलम ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. साठे यांनीसुद्धा महिलेविरोधात तक्रार अर्ज २७ डिसेंबर रोजी दिला आहे. त्यात महिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले.