लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नगरपरिषद हद्दीतील देऊरवाडा पुनर्वसन येथील पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून ठप्प पडल्याने या परिसरातील संतापलेल्या महिलांनी गुरूवारी पाण्यासाठी पालिकेवर धडक दिली.गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडा पुनर्वसन परिसरात पालिकेतर्फे पाणीपुरवठा होत आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून हातपंप बंद झाल्याने पाणीपुरवठा ठप्प पडला. त्यामुळे महिलांना काम सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात अनेकांची मजुरी बुडत असल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. लोकप्रतिनिधी केवळ मत मागायला येतात, समस्यांची मात्र कुणीच दखल घ्यायला तयार नाही, असा आरोप नागरिकांनी केला. याबाबतच जाब विचारायला गुरूवारी या परिसरातील महिलांनी पालिकेवर धडक दिली.महिला पालिकेत आल्या असता नगराध्यक्ष अर्चना मंगाम, मुख्याधिकारी टाले अनुपस्थित होते. त्यामुळे आमचा वाली कोण, असा संतप्त सवाल महिलांनी केला. नंतर पाणीपुरवठा सभापती लक्ष्मण पठाडे पालिकेत पोहोचले. त्यांनी नगरपरिषदेने संबंधित दुकानदाराची जुनी देयके अदा केली नसल्याने दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मिळत नसल्याची कबुली दिली. त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचेही सांगितले. पालिकेने त्वरित दुकानदाराचे देयक अदा करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.येथील पालिकेत शिवसेना आणि काँग्रेसची संयुक्त सत्ता आहे. मात्र खुद्द सत्ताधारी असूनही पाणीपुरवठा सभापतीचेंच कुणी ऐकत नसेल, तर आमची समस्या कोण मार्गी लावणार, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे कुणाकडेही उत्तर नव्हते. यावेळी नगरसेविका जोत्स्ना ठाकरे, शंकर वाघमारे, निलोफर शेख, इमला रणमले, शाबदा शेख, अमिना शेख, कुसूम भोयर, ऊषा जाधव, तारा पठाण, सब्बाभाई भरगडे, मिना कांबळे, सघूबाई पारधी आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित होत्या.राकाँचे अनास्था आंदोलनआर्णी : शहरातील विकास कामे ठप्प झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी पालिकेसमोर ठिय्या देत अनास्था आंदोलन केले. यापूर्वी सीओंना निवेदन देऊनही विकास कामे सुरू झाली नसल्याने राकाँच्या नगरसेवकांनी हे पाऊल उचलले. सीओ शेषराव टाले, डीपीओ शशीमोहन नंदा यांनी आंदोलनाला भेट देऊन कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात राकाँचे नगरसेवक चिराग शहा, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, नगरसेवक यासीन नागानी, शंकर वाघमारे, उमा शिवरामवार, ज्योत्स्ना ठाकरे, अंजली खंदार, स्वाती व्यवहारे आदींनी सहभाग घेतला.
आर्णी पालिकेवर पाण्यासाठी हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 9:32 PM
नगरपरिषद हद्दीतील देऊरवाडा पुनर्वसन येथील पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून ठप्प पडल्याने या परिसरातील संतापलेल्या महिलांनी गुरूवारी पाण्यासाठी पालिकेवर धडक दिली.
ठळक मुद्देमहिला संतापल्या : दहा दिवसांपासून पाणीपुरवठा पडला ठप्प