पोलीस अधीक्षकांना निवेदन : श्रमिक पत्रकार संघाची मागणी यवतमाळ : लोकमतचे सोनखास येथील वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. लोकमतचे वार्ताहर पांडुरंग भोयर यांना मारहाण करून जातीवाचक शिविगाळ आरोपी मुरलीधर ठाकरे याने केली. घटनेनंतर भोयर यांनी लाडखेड पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दिली. गुन्हाही दाखल झाला, परंतु आरोपीला अटक करण्यात आली नाही. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सदर निवेदन अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन भागवते, सचिव अमोल शिंदे, दिनेश चोरडीया, महमूद नाथानी, संदीप खडेकर, मनिष जामदळ, समिर मगरे, सुरज पाटील, रवी राऊत, केशव सवळकर, प्रवीण देशमुख, मनोज जयस्वाल, मनोज कटकतलवारे, चेतन देशमुख, रवींद्र शिंदे, अमोल ढोणे, राजकुमार भितकर, सुधीर क्षीरसागर, अशोक बानोरे, दीपक शास्त्री, अमोल तुमसरे, रवी चांदेकर, रुपेश उत्तरवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. (शहर वार्ताहर) आरोपी मुरलीधर ठाकरे अद्यापही पसारच लोकमतचे वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मुरलीधर ठाकरे गत तीन दिवसांपासून पसार झाला आहे. लाडखेड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याला बुधवारी सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली नव्हती. रविवारी सकाळी लाडखेड पोलिसांनी अटकेसाठी सोनखास गाठले. पोलिसांचे वाहन दिसताच मुरलीधर घराच्या मागच्या दाराने पसार झाला. त्याचा पोलिसांनी शोध घेतला मात्र थांगपत्ता लागला नसल्याचे लाडखेड पोलिसांनी सांगितले.
वार्ताहरावर हल्ला करणाऱ्यास अटक करा
By admin | Published: April 06, 2017 12:33 AM