शहरातील भरवस्तीतील मथुरानगरमधील सागर महामुने यांच्या घरात अज्ञात सहा चोरट्यांच्या टोळीने शनिवारी स्वयंपाकघराच्या मागील बाजूचे दार फोडून प्रवेश केला. त्यांची आई शोभा महामुने, भाचा शुभम व नात हे शेजारील हॉलमध्ये झोपले होते. तेथे चोरांच्या टोळीने शोभा महामुने यांच्या पलंगाला घेरले. तेवढ्यात, त्यांना जाग आली व त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वरच्या मजल्यावरील सागरने हॉलमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांची चोरांसोबत झटापट झाली. यात सागर यांच्या छातीला दुखापत झाली. त्यांच्या आईने पुन्हा आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पोबारा केला.
विशेष म्हणजे महामुने यांच्या घराशेजारीच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वाचक सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांचे भाड्याने घेतलेले घर आहे. त्यांनी घराबाहेर निघू नये म्हणून चोरांनी त्यांच्या घराला समोरून कडी लावली होती. मात्र, जोराचा आवाज आल्याने शरद घोडके मागील बाजूने उडी घेऊन घराबाहेर पडले. तोपर्यंत चोर पसार झाले होते. चोरांनी महामुने यांच्या मंगल कार्यालयातसुद्धा चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तेथे काहीच हाती लागले नाही. या दोन्ही घटनांची तक्रार सराफा व्यापारी सागर सुधीर महामुने यांनी पोलिसांत दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अण्णासाहेब पवार अधिक तपास करीत आहे.