अमरावतीत भंडाफोड : यवतमाळात केंव्हा ?, हजेरी कागदावरच लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस मुख्यालयात राखीव कर्मचाऱ्यांच्या दरदिवशी लावल्या जाणाऱ्या ड्युट्यांचा सर्रास लिलाव केला जातो. त्यातून मासिक मोठी ‘उलाढाल’ होते. त्याचे ‘वाटेकरी’ही अनेक असतात. अमरावतीमध्ये अशा प्रकाराचा नुकताच भंडाफोड झाल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यवतमाळातही हा प्रकार सर्रास सुरू आहे. मात्र त्याचा भंडाफोड केव्हा होतो, याकडे नजरा लागल्या आहेत. जिल्हा पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस कर्मचारी तैनात असतात. त्यांना सहसा निवडणुका, सण-उत्सवातील बंदोबस्त, दंगली, अतिक्रमण हटाव मोहीम, आंदोलने अशा वेळीच नेमले जाते. अन्य काळात ते राखीव कर्मचारी म्हणून नियुक्त असतात. सहसा त्यांना रोलकॉल व परेडशिवाय काम नसते. हीच संधी साधून पोलीस मुख्यालयात संबंधित वरिष्ठांकडून ड्युट्यांचा लिलाव केला जात असल्याची माहिती आहे. ड्युट्या न लावण्यासाठीच नव्हेतर सोईच्या ड्युट्या लावण्यासाठीही पैसे उकळले जातात. पैसे न देणाऱ्यांची स्टॅन्ड-टू सारखी कठीण ड्युटी लावली जाते. ड्युट्यांच्या लिलावाच्या या पद्धतीमुळे अनेक पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजरच राहत नाहीत. त्यांची कागदोपत्री हजेरी राहते. या काळात ते दूरवर आपल्या गावी ‘तैनात’ असतात. सहसा वरिष्ठ कुणाची ड्युटी कुठे लावली, कोण सुटीवर, कोण ड्युटीवर याबाबत विचारणा करीत नसल्याने सर्व बिनधास्त असतात. मुख्यालयाच्या यंत्रणेकडून वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेक केली जाते. त्यांना चुकीची माहिती दिली जाते. एखादवेळी विचारणा झालीच तर कागदावर हजेरी दाखविली जाते. ड्युट्या लावण्यासाठीचा हा गैरप्रकार जिल्ह्यात अनेक पोलीस ठाणे आणि शाखांमध्येसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी ने-आणसाठी सोईची गार्डकाही कर्मचारी ड्युटी लागू नये म्हणून पैसे देतात तर काही वरकमाईच्या ठिकाणी गार्ड ड्युटी लागावी म्हणून पैसे मोजत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच बाहेर आली आहे. कारागृहातून आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी दरदिवशी गार्ड ड्युटी लावली जाते. अनेक गाजलेल्या प्रकरणातील ‘श्रीमंत’ आरोपींना ने-आण करायची असेल तर ते खिसे खाली करतात. त्या मोबदल्यात त्यांना तारखेवर नेताना सोईने वागण्याची, पाहिजे ते खानपानाची, मोबाईलवर बोलण्याची, नातेवाईकांना भेटण्याची, लवकर कारागृहातून नेण्याची व उशिरा कारागृहात आणण्याची मुभा दिली जाते. ही ड्युटी लावून घेण्यासाठी पोलिसांच्या अक्षरश: उड्या पडतात. गार्ड ड्युटीमध्ये आपल्या सोईचे पोलीस कर्मचारी द्यावे म्हणून कारागृहात बंदिस्त आरोपींचे पाठीराखे थेट पोलीस मुख्यालयातील यंत्रणेशी संधान बांधत असल्याचीही माहिती आहे. ‘प्रोफेशनल क्रिमीनल’च्या बाबतीत बहुतांश हा प्रकार घडतो. न्यायालयाच्या आवारात पोलीस व आरोपींच्या लागेबांध्याचे हे चित्र उघडपणे कुठेही पहायला मिळते. अनेकदा तर गार्ड ड्युटीवरील पोलीस कर्मचारीही ‘खानपाना’त सहभागी झाल्याने त्यांना गुंगारा देऊन आरोपी पसार झाल्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय रुग्णालयात भरती होणाऱ्या आरोपींच्या गार्ड ड्युटीवर वर्णी लागावी म्हणून अनेक पोलीस कर्मचारी ‘इन्टरेस्टेड’ असतात. कारण तेथे बऱ्याचबाबी बंदद्वार चालतात. रुग्णालयीन वारीतही ‘उलाढाल’ कारागृहात बंदीस्त नामांकित आरोपींना बाहेरची हवा घ्यायची असल्यास ते आजाराचे कारण पुढे करतात. त्यांची कारागृहात तपासणी करून व एक-दोन दिवस उपचारार्थ दाखल ठेऊन नंतर पुढील तपासणीसाठी (प्रकृती गंभीर असल्याचे दाखवून) शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. सेटींग असेल तरच आरोपी बहुतांश बाहेर निघतो. कुणी आजाराचे नाटक केल्यास त्याला कारागृहातीलच दवाखान्यात भरती ठेवले जाते. या सेटींगमुळे अनेक आरोपी अगदी बाहेर पाठीराख्यांना सांगितल्यानुसारच ठरलेल्या दिवशी व वेळी रुग्णालयात भरती होतात. तेथूनच पुढील प्लॅन, हिशेब ठरतात. यवतमाळ कारागृहात पूर्वी हा प्रकार होता, मात्र अलिकडे तो बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. तीन हजारांत महिनाभर गावाकडे राहण्याची सोय ड्युट्यांच्या या लिलावात होणारी मासिक ‘उलाढाल’ किती तरी हजारांवर पोहोचते. ‘लगतच्या प्रांतात’ गावाकडे जायचे असेल आणि दोन-तीन आठवडे रहायचे असेल तर पोलीस कर्मचारी मासिक दोन ते तीन हजार रुपये मोजत असल्याचेही सांगितले जाते. यातून काही महिला कर्मचारीही सुटल्या नाहीत. पैसे न देणाऱ्यांना मात्र त्रासाचा सामना करावा लागतो. अमरावतीमध्ये सहायक पोलीस आयुक्तांनी (प्रशासन) मुख्यालयात अचानक भेट दिल्याने तेथील ड्युट्यांमधील गैरप्रकार उघडकीस आला. त्यात अनिल बागडे व दत्तात्रय ढोरे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अमरावती पेक्षाही गंभीर प्रकार यवतमाळ पोलीस मुख्यालयात सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याचा भंडाफोड नेमका केव्हा होतो, याकडे प्रामाणिकपणे ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस मुख्यालयात ‘ड्युटी’साठी लिलाव
By admin | Published: May 26, 2017 1:12 AM