यवतमाळ : ओबीसींचा अवमान झाला म्हणून केंद्रातील भाजप सरकार गवगवा करीत आहे. मात्र ओबीसींची जातवार जनगणना टाळणारे भाजप सरकारच ओबीसींचा खरा अवमान करीत आहे, अशी टीका करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी संपूर्ण समाजबांधव संविधान चौकात गोळा झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. निवडणुकीत इव्हीएम मशिनचा वापर करू नये, खासगी क्षेत्रातही एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, शेतकऱ्यांसाठी एमएसपी हमी कायदा करावा, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांची रोखलेली शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. यावेळी गजानन उल्हे, दीपक प्रधान, किशोर राठोड, बळीराम दिवटे, सुरेंद्र परडके, हरीश राऊत, सारिका भगत, नीरज कचवे, विलास भोयर, प्रवीण गुजर, संदीप मून, दर्शन परडके, सुखदेव पंचभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी स्वीकारले.
यापुढे ५ एप्रिल रोजी देशातील ५६३ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १७ एप्रिल रोजी या सर्व ठिकाणी रॅली काढली जाणार आहे. तर आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, असे गजानन उल्हे यांनी सांगितले.