यवतमाळ : जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपूर्ण कापूस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या बातम्यासमोर आल्यावर आता संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभ्या कापसाच्या पिकाचं गुलाबी अळीच्या हल्ल्याने नष्ट झालं आहे. या दशकातील सर्वात मोठे आर्थिक संकट असून, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकांचे कमीत कमी रुपये १० हजार कोटींचे नुकसान होत आहे. यामुळे अळीच्या हल्ल्याने तूर व सोयाबीनचे पीक गारद झाल्याचा माहिती कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या कापूस उत्पादक क्षेत्राचा दौरा करून सादर केलेल्या अहवालात दिली आहे .मागील वर्षी सोयाबीन व तूर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या विक्रमी तोट्याचा सामना करावा लागला होता. यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमधल्या बी . टी . कापसाच्या पिकावर मोठया प्रमाणात गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होणार आहे. या सावधानतेच्या इशाऱ्याला न जुमानता केलेली पेरणी आता थिप्स, मिलीबग, बॊडअळी, गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात येत असल्याची गंभीर चिंता तिवारी यांनी ऑगस्ट महिन्यातच सरकारला दिली होती.जगात बोंडअळीमुळे अख्खी कापसाची उभी पिकं नष्ट होत असल्यामुळे व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर सुरू झाल्याने अमेरिकेच्या मोनसँट्रो या कंपनीने "बोंडअळीरक्षक बोल गार्ड" म्हणजे बी. टी. कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले. भारत सरकारने या बी टी बियाण्याला २००४ मध्ये सरसकट वापराची परवानगी दिली. मोनसँट्रो या कंपनीला प्रती ४५० ग्रॅमच्या संकरीत बियाणांच्या मूळ किमतीच्या चौपट किंमत आकारून दिली. सुरुवातीला कीटक नाशकाच्या वापरात घट आली व भारतामध्ये कापसाचे उत्पादन विक्रमी झाले. मात्र २००८ पासून उत्पादनात घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बी टी कापसावर थिप्स, मिलीबग, बॊंडअळी, गुलाबी अळी यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. मात्र मागील दोन वर्षांत गुजरात, तेलंगणा, पंजाब व मराठवाड्यात मोठया प्रमाणात बॊंडअळी, गुलाबी अळी यांचा हल्ल्यामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मागील वर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे. मात्र यावर्षी संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरिकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे "बोंडअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूंवर निरोधकता आल्यामुळे पूर्णपणे अयशस्वी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
बी. टी. कापसावर गुलाबीअळीचा प्रादुर्भाव, महाराष्ट्रात ४० लाख हेक्टरमधील उभ्या कापसाच्या पिकाची नासाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 6:24 PM