यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बॅंक अवसायनात निघाली आहे. या संस्थेची ९७ कोटींची वसुली होणार आहे. यासाठी महिला बॅंक संचालक आणि अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अवसायकांनी संचालक आणि अधिकाऱ्यांच्या मालकीच्या सर्व व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. या संदर्भात अवसायकांनी आक्षेप मागविले आहे.
बाबाजी दाते महिला सहकारी बॅंक या संस्थेमध्ये अधिनियम १९६० चे कलम ८८ (१) अन्वये चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात संस्थेत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सद्य:स्थितीत कार्यालयाकडून वसुली कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन अध्यक्ष विद्या केळकर, तत्कालीन संचालिका गीता मालीकर, शोभा बनकर, उषा दामले, प्रगती मुक्कावार, प्रणिता देशपांडे, सुशीला पाटील, अनुराधा अग्रवाल, सुजाता महाजन, राजश्री शेवलकर, शीला हिरवे, जया कोषटवार, मंजुश्री बुटले, पौर्णिमा गिरडकर, सुरेखा गावंडे, शीतल पांगारकर या व्यक्तींच्या नावे मालकीच्या असलेल्या सर्व चल आणि अचल संपत्तीचे हस्तांतरण खरेदी-विक्रीचे व्यवहार किंवा त्यांच्या मालकीची मालमत्ता तारण अथवा गहाण ठेवण्याचे व्यवहार कार्यालयाच्या संमतीशिवाय करण्यात येऊ नये, याबाबतचे आदेश अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी काढले आहेत. या संदर्भात संबंधितांकडून आक्षेप मागविण्यात आले आहे.
महिला बॅंक संचालकांच्या मालमत्तेवर वसुली प्रकरणामुळे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी ते व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मालमत्तेवरच टाच आली आहे. यामुळे ज्या ठेवीदारांचे पैसे बुडाले, त्यांच्या पैसे मिळण्याच्या आशा पल्लवित होणार आहेत.
३६ हजार सभासदांंचे १८५ कोटी अडकले
महिला बॅंकेच्या ४० हजार सभासदांना त्यांच्या ठेवीचे ३०० कोटी रुपये वित्त हमी महामंडळाकडून परत मिळाले आहेत. यानंतरही ३६ हजार सभासदांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. आता अवसायकाला रकमेची वसुली करून सर्वप्रथम ठेवी वित्त हमी महामंडळाला ३०० कोटी रुपये परत द्यावे लागणार आहे. सध्या बॅंकेजवळ गुंतवणुकीतील व चालू वर्षाच्या वसुलीतील २२५ कोटी रुपये आहेत. मात्र, अजूनही ७५ कोटी रुपये जुळवावे लागणार आहेत. ३०० कोटी रुपये परत केल्यानंतर उर्वरित ३६ हजार सभासदांचे १८५ कोटी रुपये परत मिळणार आहेत. त्यासाठी वसुली मोहीम राबवावी लागणार आहे. अवसायकांकडून ९७ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.