कळंब (यवतमाळ) : बाभूळगाव तालुक्यातील तांबा घाटातून रेतीची तस्करी केली जात आहे. सोमवारी कोठा येथील एक ट्रॅक्टर बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पाघोरे यांनी पकडला. परंतु कारवाई कशी करता हेच पाहतो, असे आव्हान रेती तस्कराने थेट तहसीलदारांना दिले. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून कळंब पोलिसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.
तहसीलदार मीरा पाघोरे या पहाटे ५ वाजताच्या सुमारास महसूल कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तांबा घाटावर पोहोचल्या. तेथे कोठा येथील ट्रॅक्टर (क्र.एमएचव्ही २९५८) तांबा घाटातून रेती आणताना आढळून आला. चालकाने ट्रॅक्टर थांबविण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत भरधाव निघून गेला. काही अंतरावर रेती खाली करून चालक पळून गेला. काही वेळाने ट्रॅक्टर मालक सागर भानुदास झळके (रा. कोठा) व चालक प्रवीण हरिदास केवदे (रा. तांबा) घटनास्थळी तांबा ते कोठा रोडवर आले. टॅक्टर जप्त करून नेला जात असताना सागर झळके याने आपले चारचाकी वाहन ट्रॅक्टरपुढे उभे करून गाडी जाळण्याची धमकी दिली. तहसीलदार मीरा पागोरे यांच्याशी वाद घातला.
प्रकरण हाताबाहेर जात असल्याने कळंब पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ट्रॅक्टर कळंब तहसील कार्यालयात लावण्यात आला. वेणीचे मंडळ अधिकारी संतोष भागवत यांच्या तक्रारीवरून आरोपी सागर झळके व प्रवीण केवदे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी थेट तहसीलदारांना आव्हान देण्याचा प्रकार रेती तस्कराकडून करण्यात आला. रेती वाहतूक केल्याचा ठोस पुरावा असताना खाली ट्रॅक्टरवर कारवाई केली जात असल्याचा आव आणण्यात आला. परंतु हा बनाव हाणून पाडत कायदेशीर कारवाई करण्यात आली.