आर्णी - म्हणाल तर वावटळीची गिरकी पण ती पाळण्यातील चिमुकल्याचे प्राणपाखरु घेऊन उडाली. वादळ शांत झाले तेव्हा, सारेच संपले. एक जीव होत्याचा नव्हता झाला होता. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी येथे १ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या या घटनेची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे.
सुनील किशोर राऊत यांचा दीड वर्षाचा मंथन शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे पाळण्यात झोपी गेला तो शेवटचाच. वावटळीच्या रुपाने दबा धरून बसलेला मृत्यू झडप घालेल याचा मागमूसही त्या घरातील जीवांना नव्हता. कडक उन्हाची काळदुपार निष्ठूर झाली. वादळ म्हणावे असे नव्हतेच. नेहमीचीच वावटळ होती. नवीनच बांधलेल्या सुनील राऊत यांच्या घरात अँगलला पाळणा टांगला होता. घर बांधून जेमतेम तीन महिने झाले होते. नव्या घराचे, नव्या जीवाचे, त्याच्या बोबड्या बोलाचे कोडकौतुक सुरू असताना आक्रीत घडले. वावटळ केवळ सुनील यांच्याच घरात शिरून तिने छपराला बांधलेल्या अँगलसह चिमुकल्या मंथनचा पाळणा कवेत घेतला. शेजारच्या घरांना भणक लागण्याआधीच पाळणा साठ ते सत्तर फूट उंच उडाला. सर्व जण जीव टांगलेल्या पाळण्याचा हवेतील थरार केवळ बघत राहिले. छप्पर घेऊन उडालेली वावटळ शांत झाली तेव्हा जवळपास शंभर फूट अंतरावर टीन अस्ताव्यस्त विखुरले गेले होते. घर पूर्णपणे उघडेबोखडे पडले. मंथनच्या आईबाबांचा जीवाचा आकांत आसमंत पिळवटून टाकणारा होता. खाली पडलेल्या पाळण्यातील गुंतलेला जीव निपचित शांत झाला होता.
मंथन जिवंत असेल या भाबड्या आशेने यवतमाळच्या दिशेने सुरू झालेला त्याचा प्रवास अखेरचाच होता. सर्वप्रथम लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत घोषित होईपर्यंतची घालमेल लोणीकरांनी अनुभवली. यवतमाळ येथे शवविच्छेदनानंतर मंथनचा मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला. संध्याकाळी शोकाकूल वातावरणात गावकऱ्यांनी मंथनला अखेरचा निरोप दिला. मंथनला पाच वर्षांची दिव्या नावाची थोरली बहीण आहे. आई अरुणा गृहिणी तर वडील सुनील यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुनील यांचा व्यवसाय डबघाईस आला असताना नवे अस्मानी संकट कोसळल्याने नैसर्गिक आपत्तीची मदत घोषित करावी. पंचनामे आणि नंतर मदतीसाठी घ्यावे लागणारे खेटे पाहता ही दुर्घटना झुळूक बनून विरुन जाऊ नये, अशी भावनात्मक मागणीच लोणी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी केली आहे.