उमरखेड (यवतमाळ) : वेगळ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण निधी खर्चाचे वाटप केले नाही म्हणून येथील मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल, तर वांदे करेल. यानंतर जर कमी निधी दिला, तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली. या संवादाचा ऑडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत स्वत:च्या उत्पन्नातून आरक्षित केलेला निधी तीन वर्षांपासून अखर्चित असल्याची तक्रार एका व्यक्तीने आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला खडसावले. बच्चू कडू म्हणाले, जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेल. यानंतर जर कमी निधी दिला, तर तिथे येऊन वांदा करेल. अनुशेषासह निधी वाटप करा. एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी खर्च करा. यानंतर जर निधी कमी दिला, तर तुम्हाला सांगतो, असे त्यांनी सुनावले.
दिव्यांगांच्या निधी वाटपावरून आमदार बच्चू कडू संतापले होते. दिव्यांगांचा निधी वाटणे जिवावर येत का ? असा सवालदेखील त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला. कडू म्हणाले, दिव्यांगांच्या निधीचे वाटप केले नाही, तर निलंबनाची कारवाई करेल. दिव्यांगांचा निधी वाटणे जिवावर येत का? असा अन्याय कराल तर तुम्हाला माहिती आहे माझे काम कसे आहे. मी आमदार असल्याचे विसरून जाईल, असा दम त्यांनी भरला.
दिव्यांगांच्या निधीचे चुकीच्या पद्धतीने वाटप केले. गेल्या वेळचे १४ लाख आणि यावर्षीचे १० लाख वाटप करा. आस्थापनांचा खर्च काढून तुमचाही खर्च काढा. एक लाख पगार घेता; पण डोके लावत नाही. थोडे मन लावा, असेदेखील बच्चू कडू म्हणाले. आमदार कडू आणि मुख्याधिकाऱ्यांमधील या संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.