आंतरजिल्हा बदली : त्वरित पदस्थापना देण्याचा दिला अल्टीमेटम यवतमाळ : आंतरजिल्हा बदलीत पदस्थापना देण्याच्या मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून उपोषणाला बसलेल्या शिक्षिकांच्या मदतीसाठी शनिवारी आमदार बच्चू कडू धावून आले. त्यांनी प्रशासनाला उपोषणकर्त्यांना त्वरित पदस्थापना देण्याचा अल्टीमेटम दिला. पदस्थापना मिळविण्यासाठी आठ शिक्षिकांची सात वर्षांपासून पायपीट सुरू आहे. अद्याप त्यांना पदस्थापना मिळाली नाही. यासाठी त्यांनी वारंवार निवेदने दिली. गेल्या मे महिन्यात सतत पाच दिवस उपोषणही केले. आता त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर चिमुकल्यांसह बेमुदत उपोषण सुरू केले. त्यात सोनाली आलसेटवार, ताई बोडखे, सुषमा पडगीलवार, प्रियंका तेलगोटे, अंकिता गोविंदवार, सोनाली नगराळे, प्रभा चोपडे, भाग्यश्री जागृत आदी सहभागी झाल्या. या शिक्षिकांच्या समस्या ऐकून शनिवारी आमदार बच्चू कडू सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास उपोषण मंडपात दाखल झाले. तेथे त्यांचे गाऱ्हाणे ऐकून उपोषणकर्त्यांसह त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला याचे कार्यालय गाठले. तेथे त्यांनी सिंगला यांच्यासमोर समस्या कथन केल्या. तेथे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर उपस्थित होत्या. आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. आत्तापर्यंत रोस्टर मंजूर करवून का आणले नाही, अधिकाऱ्यांना शासन निर्णयाची माहिती नाही, जात पडताळणी प्रमापणत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांवर अद्याप कारवाई का केली नाही, या सर्व बाबींना जबाबदार कोण, अशा प्रश्नांनी डॉ.पाटेकर गांगरून गेल्या होत्या. आंतरजिल्हा बदली संदर्भात येत्या २९ आॅगस्टला सर्व संबंधित शिक्षकांचे शिबिर घेण्यात येईल. त्यासाठी येत्या १५ दिवसांत संबंधित सर्व शिक्षकांना नोटीस पाठविण्यात येईल. नंतर रिक्त जागा व प्रवार्गानुसार आंतरजिल्हा बदलीतील शिक्षिकांना पदस्थापना देण्यात येईल, असे आश्वासन कडू यांना देण्यात आले. आमदार कडू यांनी रोस्टर तातडीने मंजूर करवून या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवावे, अशी सूचना यावेळी केली. तसेच ‘पेसा’चा धाक दाखवून नियुक्ती टाळू नका, असा इशाराही दिला. यावेळी दीपक धोटे, महेश ठाकरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बच्चू कडू शिक्षिकांच्या मदतीला
By admin | Published: July 31, 2016 1:06 AM